गुन्हे महत्त्वाचे: 1)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्याच घरातील तब्बल ७ लाख ७८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. मतिन नूर कासम शेख असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनीच त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 2)एकतर्फी प्रेमातून कॉलेज युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे. लग्नासाठी नकार दिल्याने घरात घुसून माथेफिरु तरुणाने तरुणी आणि तिच्या आईवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 3) हडपसर गावातील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे. आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्यारे आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 4)केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी १५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. आतापर्यंत केडीएमसीचे ३७ अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. केडीएमसीमध्ये बांधकाम आणि बांधकामातून मिळणारा पैसा हा किती प्रमाणात वसूल केला जातो, हेच यातून उघड होत आहे 5)खर्चासाठी पाचशे रुपये न दिल्याचा राग आल्याने एकाने विश्रांतवाडीतील ‘शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक’ दुकानाच्या मालकावर रविवारी दुपारी एकच्या सुमारास कोयत्याने वार केले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.