मुक्तपीठ टीम
कॉर्पोरेट सेक्टर म्हटलं का कोरडेपणाच, असा समज कायमच अनेकांच्या डोक्यात असतो. पण कॉर्पोरेटमध्येही भावनिक ओलावा जपत कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचे कर्तव्य अनेक कंपन्या बजावतात. त्यातून कंपनीसाठीही दूरगामी फायदे मिळवतात. अशाच एका कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक सजगता निर्माण करण्यासाठी एक चांगली योजना आखली आहे. ती आहे फिटनेस बोनसची.
निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी झीरोधा या वित्तीय सेवा कंपनीने एक अनोखा पुढाकार घेतला आहे. कंपनीने आरोग्यवंत कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. तसेच, जो कोणी फिटनेस गोल साध्य करतो तो लकी ड्रॉ अंतर्गत १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकू शकतो.
झीरोधाची फिटनेस बोनस योजना
- झीरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची घोषणा केली.
- ते म्हणाले, “पहिल्या लॉकडाऊन नंतर, इतर क्षेत्रांप्रमाणे झीरोधाची संपूर्ण टीम शारीरिक श्रमाचा अभाव, काम आणि जीवनातील असंतुलन आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे त्यांच्या आयुष्याच्या सर्वात अनारोग्यदायी टप्प्यातून जात होती.
- अशा परिस्थितीत, आम्ही आमचा ग्रुप निरोगी ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम चांगला झाला.”
फिटनेस बोनससाठी लक्ष्य
- त्यांच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येकाला आरोग्याशी संबंधित १२ महिन्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यास आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी महिन्याला चांगल्या आरोग्याबद्दल अपडेट देण्यास सांगितले गेले.
- सहभाग वाढवण्यासाठी लक्ष्य गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळेल.
- लकी ड्रॉ विजेत्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अशी कंपनीने माहिती दिली आहे.
‘गेट हेल्थी’ हा कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी कायमच सुरू राहील असा कंपीनीचा दावा आहे.