मुक्तपीठ प्रतिनिधी
उद्धव भाऊराया, कोरोनात आमचा घरचा माणूस गेला,दवाखान्यात पैसा ही गेला. कर्जबाजारी झाल्याने शासनाने काहीच मदत केली नाही की रोजगाराची मदतही केली नाही.. ऐन दिवाळीत आमच्या घरात अंधार दाटला आहे. तुम्ही तरी भाऊराया म्हणून आमच्या पाठीशी उभे राहा अशी आर्त साद कोरोनात विधवा झालेल्या शेकडो महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टकार्ड लिहून केली आहे.. राज्यातील अनेक जिल्ह्यातील महिलांनी असे पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिगत नावावर पाठवले आहेत….
त्याच वेळी कोरोना ‘एकल महिला पुनर्वसन समितीच्या’ कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पेक्षा ५०० पेक्षा जास्त ईमेल करून ५० हजार रुपयांची जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने केंद्र सरकारने स्वतंत्र एक लाख रुपये द्यावेत व राज्य सरकारने स्वतंत्र एक लाख रुपये असे दोन लाख रुपये करून विधवांना द्यावेत कारण या महिला दवाखान्याच्या खर्चाने कर्जबाजारी झालेल्या आहेत असे आवाहन केले आहे..
त्याच वेळी महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदार यांना भेटून हे कार्यकर्ते निवेदन देत आहेत व केंद्र व राज्य सरकारने दोन लाख रुपये द्यावेत म्हणून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी विनंती करीत आहेत..
कोरोना विधवांच्या प्रश्नावर इतका पाठपुरावा करून सुद्धा अनेक घोषणा होऊनही अजून कोणतीच योजना या महिलांसाठी अमलात आली नाही.. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली वात्सल्य समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले परंतु निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यात अजून समितीच स्थापन झाली नाही. रोजगारासाठी सरकारने अजून काहीच केले नाही. ५० हजार रुपये ची मदत देणे दूरच पण त्याचा साधा शासन आदेश सुद्धा अजून निघाला नाही. यातून या महिलांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे. त्यामुळे या महिलांनी भाऊबीजेसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून आर्त साद घातली आहे.
सरकारने कोणतीच आर्थिक मदत केली नाही,रोजगारासाठी तरतूद केली नाही त्यामुळे या महिलांना सरकारच्या दारात उपोषण करण्याची वेळ सरकारने आणू नये असा इशारा कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी दिला आहे…