मुक्तपीठ टीम
आज कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षावरील आणि इतर व्याधी असणाऱ्या ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यामुळे लसीबद्दल काहींच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात लसीकरणाचा पहिला डोस घेतला. तर आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस जेजे रुग्णालयात घेतला आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे शरद पवार महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
शरद पवार जेजे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सीरम इंस्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. त्यानंतर त्यांना ३० मिनट निरीक्षणात ठेवण्यात आले. यावेळी रुग्णालयात पवारांसोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. याशिवाय जेजे रुग्णालयातील अधिष्ठाता तात्याराव लहानेही उपस्थित होते.
किती जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
- देशात आतापर्यंत १ कोटी ११ हजार १२ हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
- यापैकी आतपर्यंत १ लाख ५७ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला.
- १ कोटी ७ लाख ८४ हजार ५६८ जण कोरोनामुक्त झाले आहे.
- सध्या १ लाख ६५ हजार ७१५ जणांवर उपचार सुरू आहेत.
- तसेच आतापर्यंत १ कोटी ४३ लाख १ हजार २६६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.