मुक्तपीठ टीम
देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. गेले तीन दिवस मुंबईत मात्र नवीन रुग्ण घटत असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने नुकतंच तिसरं सेरो सर्वेक्षण केलं. यामध्ये महानगरपालिका हद्दीतील १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यातील ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. याचा अर्थ तेवढ्या मुंबईकरांमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. एकीकडे इमारतींमध्ये राहणाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज वाढत असताना झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांमध्ये मात्र ते प्रमाण घटताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतील जास्त रुग्ण हे इमारतींमधील असल्याचे आढळून येत आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
१० हजार १९७ नागरिकांच्या तपासणीतून निष्कर्ष
- नमुना निवड पद्धतीचा वापर करून करण्यात आलेल्या या सेरो सर्वेक्षणात १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे.
- यापैकी ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.
- झोपडपट्टीच्या तुलनेने इमारतींमधून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण जास्त आहे.
इमारतींच्या परिसरात अँटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण
- २०२०च्या जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पहिले सेरो सर्वेक्षणात बिगरझोपडपट्टी परिसरात अँटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण १८ टक्के होते.
- २०२०च्या ऑगस्टमध्ये यात दोन टक्क्यांनी वाढ झालेली दिसली.
- २०२१ एप्रिलमध्ये केलेल्या तिसऱ्या सर्वेक्षणात ते प्रमाण २८.५ इतके वाढल्याचे दिसून आले.
झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण
- झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण पहिल्या सर्वेक्षणात ५७ टक्के होते.
- दुसऱ्या सर्वेक्षणात ४५ टक्के होते.
- जे तिसऱ्या सर्वेक्षणात ४ टक्क्यांनी घसरून ४१.६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली.
कसे झाले सिरो सर्वेक्षण?
- या सर्वेक्षणात महापालिका दवाखाने आणि खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्त नमुन्याची चाचणी करण्यात आली होती.
- विशेष म्हणजे लसीकरण न झालेल्या लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते.
- सर्वेक्षणानुसार ३५.०२ टक्के पुरुषांमध्ये, तर ३७.१२ टक्के स्त्रियांमध्ये अँटीबॉडीज आढळली.