मुक्तपीठ टीम
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची संसर्ग लाट वेगाने उसळत असल्याने राज्य सरकारने २७ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्याचबरोबर मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्बंध आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश १५ मार्च २०२१पर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार रात्री ८ ते सकाळी ७ च्या दरम्यान ५ पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असणार आहे. तसेच नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे आता एकप्रकारे बाहेर फिरून अनवधानानेही जमावबंदी नियमभंग होऊ नये म्हणून बहुतांश लोक आठच्या आत घरी परतणेच पसंत करण्याची शक्यता आहे.
मार्गदर्शक सूचना
- सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार.
- सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. मात्र या वेळात होम डिलिव्हरी सुरु राहील.
- सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
- पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
- पाचहून अधिक व्यक्ती एकत्र आल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड.
- बागा, उद्याने आणि समुद्र किनाऱ्यावर प्रवेश रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहील. हा नियम भंग केल्यास १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
- कुठलेही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मेळावे यांना परवानगी नाही.
- सभागृह किंवा नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
- विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.
- अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत.
- गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे.
- कोरोना पॉझिटिव्ह असल्यास संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी सूचना फलक, तसेच रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरण शिक्काही मारण्यात येईल.
- खासगी आस्थापना (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्केपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील.
- शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोरोना परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करू शकतात.