मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी मुंबईत १ हजार २०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ३० जूननंतर एका दिवसात नोंद झालेल्या नवीन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत १० दिवसांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे.
गुरुवारी कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत मागील २४ तासांत ६८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या उत्साहाचं वातावरण आहे, गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे.
मुंबईत पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आली होती. पण आता पुन्हा शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, बुधवारी शहरात कोरोना रुग्णाची ९७५ नोंद झाली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणांसह, मुंबईत आतापर्यंत कोरोना रुग्णांची ११,३५,६८० प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर १९,६७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत ११,२५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यासह, आतापर्यंत १,७९,८०,३७० नमुने तपासण्यात आले आहेत.त्यानुसार मुंबईत सध्या ५ हजार ७१२ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात राज्यात २२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर १९२० रुग्ण बरे झाले आहेत.
ही आहे दहा दिवसांची आकडेवारी
- १८ ऑगस्ट २०२२-१२०१
- १७ ऑगस्ट २०२२- ९७५
- १६ ऑगस्ट २०२२- ३३२
- १५ ऑगस्ट २०२२- ५८४
- १४ ऑगस्ट २०२२- ८८२
- १३ ऑगस्ट २०२२-८६७
- १२ ऑगस्ट २०२२-८७१
- ११ ऑगस्ट २०२२-६८३
- १० ऑगस्ट २०२२- ८५२
- ०९ ऑगस्ट २०२२- ४७९