मुक्तपीठ टीम
संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध प्रभावी औषध शोधत आहे. त्यासाठी एक मोठा वर्ग आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींकडे आशेने पाहत आहे. हरियाणाच्या मानेसर येथील नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर म्हणजेच एनबीआरसीच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले आहे की, ज्येष्ठमध हे कोरोनाविरूद्ध प्रभावी औषध सिद्ध होऊ शकते. ज्येष्ठमध या आजाराची तीव्रता कमी करण्याव्यतिरिक्त, संसर्गामुळे विषाणू वाढण्याची क्षमता देखील कमी करू शकते. अर्थात हे सर्व प्रायोगिक स्तरावर आहे. अद्याप त्यावर संशोधन सुरु आहे.
जगभरात पसरलेल्या कोरोना साथीला वर्ष उलटले. लसही आली. पण अद्याप संपूर्ण प्रभावी म्हणता येईल, असे औषध मिळू शकलेले नाही. या विषाणूच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आजही प्रभावी औषध शोधले जात आहे. भारतासह जगातील बर्याच देशांनी कोरोना लस तयार केली असून लोकांना कोरोना लसदेखील दिली जात आहे. परंतु ती प्रतिबंधक उपाय आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी आजही डॉक्टरांकडे मोजकी औषधे आहेत. तीही खरेतर थेट कोरोनासाठी नाहीत. त्यामुळेच आता ज्येष्ठमधाच्या औषधी गुणधर्माचा वापर कोरोना उपचारात करण्याकडे आशेने पाहिले जात आहे.