मुक्तपीठ टीम
कोरोना काळात डॉक्टर लोकांसाठी देव बनत असतील तर मंदिर रूग्णालय का नाही बनू शकत? नेमक्या याच सेवाभावातून कांदिवलीमधील जैन समुदायाचे मंदिर असलेल्या पावनधाममध्ये कोरोना केअर सेंटर उघडण्यात आले आहे. हे गेल्या लाटेत सुरु करण्यात आले होते. आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून पावनधाम मंदिरातील कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू झाले आहे. येथे लोकांवर उपचार केले जात आहेत आणि लोक बरे होऊन घरी परतत आहे. खऱ्या अर्थानं एका तीर्थस्थळासारखं पुण्याचं कार्य घडत आहे.
असं आहे पावनधाम मंदिर उपचारालय…
• जैन समुदायाच्या ५ मजली पावनधाम मंदिरात जनरल वॉर्डपासून ते डिलक्स श्रेणीच्या १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
• ऑक्सिजन, एक्स-रे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
• कोरोना रुग्णांच्या देखरेखीसाठी २४ तास डॉक्टरांची टीम उपलब्ध असते. एवढेच नाही तर मंदिराच्या आत बांधलेल्या या कोरोना केअर सेंटरमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
• कांदिवली पश्चिमेतील पावनधाम सेवाभावी केंद्र कोरोनाने बाधित झालेल्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे.
• या केंद्रामध्ये तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी असतात.
• डॉक्टर, परिचारिका, सहाय्यक कर्मचारी, व्यवस्थापन अधिकारी आणि इतर असे ७० कोरोना वॉरियर्सची टीम येथे आहे.
उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाल शेट्टी यांनी त्यामागील संकल्पना सांगितली, “या जागतिक महामारीच्या काळात जैन आध्यात्मिक नेते नाममुनि महाराजांची रुग्णसेवेची इच्छा होती. गरजू जनतेची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यातूनच हे पावनधाम केंद्र सुरु झाले.”
ते पुढे म्हणाले की, “पावनधाममध्ये रुग्णांकडून पूर्ण कोरोना उपचारासाठी दररोज १,००० रुपये शुल्क आकारले जात आहे. यात लॉजिंग-बोर्डिंगचा समावेश आहे. परंतु त्यांना बाह्य चाचण्यांसारख्या काही सेवांसाठी वेगळे पैसे द्यावे लागतील,”
“सेवाभावातून धार्मिक-सामाजिक सेवा केंद्र असलेल्या पावनधामचे खासगी कोरोना उपचार सुविधेमध्ये रूपांतर झाले”, अशी माहिती या सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची देखरेख करणारे व्यापारी नितीन सुंदरजी शाह यांनी दिली आहे.
शहा म्हणाले, “या केंद्रात १०० बेड आहेत आणि आतापर्यंत येथून जवळजवळ २०० रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करुन घरी पाठवण्यात आले आहे.”
“आत्तापर्यंत फक्त एका गंभीर रूग्णाला सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. अन्यथा वेळेवर केंद्राकडे येणारे सर्वजण आनंदाने घरी परतले आहेत, पूर्णपणे बरे झाले आहेत,” अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली आहे.