मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात पार पाडण्याचे नक्की झाल्याचे कळते. मात्र, आधी ठरवलेलं साहित्य संमेलनाचे नाशिकमधील स्थळ बदलण्यावरून वाद दिसून येत आहे. संमेलनाचे सर्वेसर्वा असणाऱ्या साहित्य महामंडळाने संमेलनस्थळ बदलण्याबाबत आमच्याकडे आयोजन समितीने कोणतेही पत्र पाठविले नसल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या वादाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे संमेलन चांगले होण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. हे नाशिककरांचे संमेलन असल्याने सर्वांनी तसे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संमेलन स्थळाचा वाद कसला?
- नाशिकचे संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात होणार असे आधी ठरले होते.
- कोरोना निर्बंधामुळे कॉलेज बंद होते, वसतीगृह रिकामे होते, त्यामुळे संमेलनाचे आयोजन सहज शक्य झाले असते.
- आता पूर्वीसारखे आयोजन शक्य होणार नाही, या भूमिकेतून काहींनी संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात न करता आडगाव येथे मेट कॉलेजच्या आवारात करण्याचे सुचवले.
- संमेलन शहरातून ग्रामीण भागाकडे जाण्याची चर्चा सुरु होताच नाशिककर साहित्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
वादामुळे भुजबळही नाराज!
- स्थळ बदलण्यावरून वाद सुरु होताच स्वागताध्यक्ष भुजबळही नाराज झाले.
- मेट ही संस्था अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात असल्यने तिला प्रसिद्धीची गरज नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.
- येथे असलेल्या दोनशे खोल्या तसेच समाजकल्याण विभागाचे हजार निवासी क्षमतेचे वसतिगृह संमेलनासाठी उपयोगी ठरेल, हे त्यांनी लक्षात आणून दिले आहे.
- संमेलन चांगल्या प्रकारे नाशिकमध्ये होणे ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब असल्याने कोणी वाद निर्माण करु नये, असेही त्यांनी सुचवले.
याआधीही संमेलन पुढे ढकलण्यात आलं होतं!
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नाशिकमध्ये हाहाकार माजला होता. दरम्यान २६ ते २८ मार्चच्या दरम्यान होणार हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं.
- जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळांना पत्र पाठवले होते.
- त्यात जुलै महिन्यात साहित्य संमेलन भरवणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती.
- मात्र, त्यावेळेसही त्यांना नकार कळवण्यात आला.
- मात्र, आता दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आढावा घेऊन दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती.
डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होण्याची शक्यता
- नोव्हेंबर महिन्यातील १९,२०,२१ या तीन तारखांचा विचार आयोजकांकडून सुरू होता.
- मात्र, आता या तारखात बदल करून हे संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे.
- शक्यतो ३ ते ५ डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होईल, अशी शक्यता आहे.
संमेलनाध्यक्षांच्या विनंतीवरून संमेलन पुढे ढकलले!
- साहित्य संमेलनासाठी नोव्हेंबरमधील तारखा ठरवण्यात आली होती.
- मात्र, त्याची कल्पना संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांना दिली नव्हती.
- त्यामुळे त्यांनी कौटुंबिक कारण सांगत ही तारीख पुढे ढकल्याची विनंती केली.
- त्यामुळे आता डिसेंबरच्या तारखेवर खल सुरू असल्याचे समजते.
- विशेष म्हणजे कोरोनाच्या नियमामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंदिस्त सभागृहात घेण्याचे आदेश आहेत.