मुक्तपीठ टीम
काँग्रेसला नव्या वर्षाच्या सप्टेंबरच्या अखेरीस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. सध्या सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला, यानंतर सोनिया गांधींनी हे पद स्वीकारले. मात्र, त्या हंगामी अध्यक्षपदी असल्याने कायमस्वरुपी अध्यक्षाची मागणी आहे. राहुल गांधींनी अनेकदा नकार दिला असला तरी काँग्रेसचे बहुतेक नेते त्यांच्यासाठीच आग्रही आहे. सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी अध्यक्षपद निवडीची माहिती दिली.
कसा निवडणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?
- काँग्रेस कार्यकारिणीने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, सप्टेंबरपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
- सध्या सभासदत्व मोहीम जोरात सुरू आहे.
- या वर्षी ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- पक्षाची डिजिटल सदस्यत्व मोहीमही सुरू आहे.
- मार्चनंतर गट, जिल्हा आणि राज्य अशा प्राथमिक स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
- त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पक्षाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. पक्षाला नवा अध्यक्ष मिळालेला असेल.
२०२४ची निवडणूक नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली!
२०२४ मध्ये काँग्रेस पक्षाला नवा चेहरा घेऊन निवडणुकीत उतरायचे आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी या पदासाठीच्या दाव्याला संमती दिली आहे. पुन्हा एकदा ते पक्षाची कमान स्वत:च्या हातात घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणूक प्रक्रियेचा प्रगती अहवाल सोनिया गांधी यांना सादर केला. मिस्त्री म्हणाले की, “काँग्रेस कार्यकारिणीने जाहीर केलेल्या मुदतीनुसार निवडणुकीचे काम सुरू असून ३१ मार्चपर्यंत सदस्यत्वाचे काम पूर्ण होईल.”