मुक्तपीठ टीम
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात ही लढत असून दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. या प्रचारादरम्यान काँग्रेसच्या तीन प्रवक्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे तिघेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांचा प्रचार करणार आहेत. राजीनामा देणाऱ्या प्रवक्त्यांमध्ये हरियाणाचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे ३ प्रवक्ते पद सोडून खरगेंचा प्रचार करणार!
- मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली.
- या पत्रकार परिषदेत दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन उपस्थित होते.
- यावेळी राजीनामा देणारे पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ म्हणाले की, आम्ही पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून खरगे यांच्या प्रचारासाठी पुढे काम करणार आहोत.
- पत्रकार परिषदेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मी कठोर संघर्षानंतर इथपर्यंत पोहोचलो आहे.
अध्यक्ष कोण होणार, हे काँग्रेसचे ९ हजार ३०० प्रतिनिधी ठरवतील!!
- पक्षाचा अध्यक्ष कोण होणार, हे ९ हजार ३०० प्रतिनिधी ठरवतील, असे खरगे यांनी सांगितले.
- हा घरचा विषय आहे.
- हे मी एकटा करणार नाही, समितीतील सर्वजण मिळून निर्णय घेतील.
- काँग्रेस प्रवक्तेपदावर असताना या तिन्ही प्रवक्त्यांनी खरगे यांचा प्रचार केल्यास पक्ष खरगे यांच्या बाजूने असल्याचे दिसून येईल, असे सांगण्यात आले.
- अशा स्थितीत तिघांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
- अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या तिघांनाही पुन्हा प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.