मुक्तपीठ टीम
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष होण्यावरून राजस्थान काँग्रेसमध्ये गदारोळ सुरु आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या या राजकीय गदारामुळेच आणि राजस्थानमधील सत्ता टिकवण्यासाठी अशोक गेहलोत आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आता मोठा निर्णय घेत अशोक गेहलोत यांना पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक गेहलोत यांच्याऐवजी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कमलनाथ यांचे नाव पुढे येत आहे. राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
कमलनाथ यांनी स्पष्टच सांगितले…
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले.
- राजस्थानमधील घडामोडीनंतर, कमलनाथ काँग्रेस अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सामील होऊ शकतात, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत असताना त्यांनी ही टीप्पणी केली.
- मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मला अध्यक्षपदात रस नाही.
मी फक्त (सोनिया गांधी) नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.
राजस्थानमधील राजकीय पेच सोडवण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर सोपवली जावू शकते….
- कमलनाथ यांची दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीकडेही राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
- सोनिया गांधींनी त्यांच्यावर राजस्थानचे संकट सोडवण्याची जबाबदारी दिल्याचे मानले जात आहे.
- कमलनाथ यांचे गेहलोत यांच्याशी चांगले संबंध असल्याचे मानले जाते.