मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातून काँग्रेसला मिळू शकणाऱ्या एकमेव जागेवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उपरा उमेदवार लादल्याने असंतोष भडकला आहे. उत्तरप्रदेशातील लोकसभा निवडणुकीत अमानत रक्कमही वाचवू न शकलेल्या इम्रान प्रतापगढींना थेट महाराष्ट्रातून राज्यसभा उमेदवारीचा बोनस दिल्याने काँग्रेसचे नेते नाराजी व्यक्त करत आहे. मात्र, आतापर्यंत शाब्दिक निषेधापर्यंत थांबलेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी आता पदांचे राजीनामे देणे सुरु केलं आहे. विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधींकडे पाठवला आहे.
यापुढेही पक्षाचे काम करत राहणार असल्याचे आशिष देशमुख यांनी म्हटलं असलं तरी त्यांचं अनुकरण इतरही काही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेससाठी प्रतापगढींची उमेदवारी हा नुकसानीचा निर्णय ठरत असल्याचं दिसत आहे.
आशिष देशमुख यांचं राजीनामा पत्र
प्रति, दिनांक- ३१.०५.२०२२
श्रीमती सोनियाजी गांधी
माननीय अध्यक्षा,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,
नवी दिल्ली.
विषय:- MPCC च्या सरचिटणीस पदाचे राजीनामा पत्र.
आदरणीय मॅडम,
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगडी (उत्तर प्रदेश) यांना लादल्यामुळे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे.
एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेस पक्षासोबत काम करत राहीन आणि वचनबद्धतेची पूर्तता करीन.
धन्यवाद..
आपला नम्र,
डॉ. आशिषराव र. देशमुख
माजी आमदार (काटोल, महाराष्ट्र)
मो.9822233000