मुक्तपीठ टीम
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती, श्री.रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले व विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण अभिवादन केले असून राज्यातील जनतेला तसेच देशवासियांना भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपला देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, त्यावेळचा काळ देशासाठी खूपच कठीण काळ होता. देशासमोर अनेक आव्हाने होती. परंतु गेली 72 वर्षे हे प्रजासत्ताक आपण टिकवले, वाढवले, सुरक्षित केले. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचे श्रेय देशातील जनतेला आणि जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेवर, भारतीय राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांना मी वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 वर्षांच्या वाटचालीत देश घडविण्यासाठी योगदान दिलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या मान्यवरांचे, राष्ट्रपती पदकांनी सन्मानीत झालेल्या राज्याच्या पोलीस, अग्निशमन, तुरुंग सेवेतील पुरस्कार विजेत्यांचे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’विजेत्या राज्यातील बालकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस चोक्कलिंगम, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, मुख्यमंत्री महोदयांचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. वीरमाता व वीरपत्नींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी राज्य शासनाच्या वतीने पोलीस विभागाला देण्यात येणारी वाहने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस विभागाला सुपूर्द करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले. तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी, ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, कर्मचारी, विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.