मुक्तपीठ टीम
“२१ वे शतक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. डॉ. आंबेडकरांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेमुळे हा भारत बहुजनांच्या हिताचा राहील. आजचा भारत दलित,कष्टकरी, श्रमिक यांच्या श्रमावर उभा असून तो फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांच्या हातात जाणार नाही. आज भारत आर्थिक दृष्ट्या श्रीलंकेच्या वळणावर निघालेला आहे, हे खरे असले तरी भारतातला शेतकरी त्याला आपल्या श्रमाच्या जोरावर उपाशी राहू देणार नाही. आजच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाला तोंड द्यायचे असेल तर लेखक – कलावंतांनी निर्भीडपणे अभिव्यक्त व्हायला पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार प्रसंगी केले.
२०२१ सालचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार डॉ. गेल ओम्वेट यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला, तर २०२२ सालचा कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार विचारवंत प्रा. हरी नरके यांना प्रदान करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून श्री. युवराज बावा, इरफान शेख आणि आबासाहेब थोरात यांना गौरविण्यात आले.
भारतातल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीचा श्वास बनून डॉ. गेल ओम्वेट यांनी कार्य केले असे सांगून भारतातल्या सर्व प्रागतिक प्रवाहांना वैचारिक दिशा कॉ. पानसरे यांनी दिली असे भावोद्गार गेल ओमवेट यांचा पुरस्कार स्वीकारताना त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
भारतीय संविधान सर्व समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू करणे ही काळाची गरज आहे . सध्या देशात लोकशाहीच्या नावाखाली संविधानातील मूलभूत तत्वांची पायमल्ली होत ववआहे. डॉ.आंबेडकरांनी सुचविलेल्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून अपप्रचार करण्याचे काम राज्यकर्ते करताहेत. असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना प्रा. हरी नरके यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे होते. सर्वसामान्य माणूस जागा होतोय, संघटित होतोय आता त्याने संघर्षास सज्ज व्हायला हवे असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्कार समितीचे समन्वयक डॉ.मिलिंद कसबे यांनी केले, तर सूत्र संचालन मनीषा कापुरे यांनी केले.
या प्रसंगी माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ, कॉ. राजू देसले, कॉ. सुबोध मोरे, डॉ.कैलास कमोद, रवी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.