मुक्तपीठ टीम
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या गदारोळामुळे भाजपा सावध झाली आहे. आता टीव्ही चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी आणि प्रवक्त्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. पक्षाने आपल्या प्रवक्त्यांना धार्मिक विषयांवर वादग्रस्त बोलणे टाळण्यास सांगितले आहे. तसेच सरकारच्या विकासकामांवर जास्तीत जास्त बोलण्याचे निर्देश दिले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असेही कडकपणे बजावण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष!
- मे महिन्यात जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेला संबोधित करताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या नेत्यांनी भाषेवर नियंत्रण ठेवावे.
- विकासाच्या मुद्द्यांवर आपल्याला ठाम राहायचे आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
- लोक तुमची दिशाभूल करून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही.
- पण भाजपाचे प्रवक्ते म्हणून जाणाऱ्यांनीच नाही तर नेते, लोकप्रतिनिधी यांनीही मोदींचा तो मंत्र लक्षात ठेवलेला नाही.
- महाराष्ट्रातही प्रवक्त्यांबद्दल नसला तरी काही नेते आणि लोकप्रतिनिधींच्या भाषेमुळे भाजपाची अडचण होत असते.
- काहीवेळा तर प्रदेशाध्यक्ष पदावरील चंद्रकांत पाटलांसारख्या नेत्यांनाही आपले वक्तव्य मागे घ्यावे लागले आहे.
सरकारच्या कामगिरीची जास्तीत जास्त माहिती देण्याच्या सूचना!!
- भाजपाने पक्षाची बाजू मांडणारे प्रवक्ते, नेते यांच्यासाठी ८ कलमी आचारसंहिता तयार केल्याची चर्चा आहे.
- भाजपाने पक्षाच्या प्रवक्त्यांना चर्चेदरम्यान चिथावणी खोर वक्तव्य करून पक्षाच्या विचारसरणीचे आणि आदर्शांचे उल्लंघन करू नये, बजावले आहे.
- प्रवक्त्यांना टीव्हीवर जाण्यापूर्वी विषय तपासण्याचा आणि त्यासाठी अभ्यासून पूर्ण तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- हे करत असताना पक्षाचं धोरणही लक्षात ठेवायला हवे, याचीही आठवण करून देण्यात आली आहे.
- चर्चेदरम्यान कोणाच्याही सापळ्यात अडकू नये, असा सल्लाही भाजपाने दिला आहे.
- भाजपाने प्रवक्त्यांनी चर्चेदरम्यान केवळ सामाजिक कल्याण आणि विकासाच्या मुद्द्यांवरच राहावे.
- सरकारच्या कामगिरीची जास्तीत जास्त माहिती लोकांना द्यावी.