मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा सीएनजी महाग झाला आहे. सीएनजीची नवीन किंमत ७९.५६ रुपये प्रती-किलोग्रॅम झाली आहे. नवीन दर १७ डिसेंबर २०२२ म्हणजेच आज सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाले आहेत. दिल्लीत सीएनजी ७८.६१ रुपये किलोग्रॅम दराने विकला जात होता, त्यात ९५ पैशांची वाढ झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत ८२.१२ रुपये किलोग्रॅम झाली आहे, तर गुरुग्राममध्ये ती ८७.८९ रुपये किलोग्रॅम झाली आहे. गेल्या काही महिन्यांत सीएनजी आणि पीएनजीच्या जरात वाढही झाली होती.
दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सीएनजीच्या किंमतीत आठ रुपयांचा फरक!
- दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सीएनजीच्या दरात सुमारे आठ रुपयांचा फरक आहे.
- गेल्या एका वर्षात राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किंमती ७० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.
- दिल्लीतील पूर्वीची सीएनजी किंमत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बदलली होती.
- त्या काळात किलोग्रॅममागे तीन रुपयांनी वाढ झाली होती.
- ऑक्टोबर महिन्यात, गुरुग्राममध्ये सीएनजी ८६.९४ रुपये प्रति किलो होता.
- नोएडा आणि गाझियाबादमध्ये ८१.१७ रुपये किलोग्रॅम होता.
एका वर्षात सीएनजी किती महागला?
- गेल्या वर्षभरात सीएनजी सुमारे ७३ टक्क्यांनी महागला आहे.
- १ ऑक्टोबर २०२२ रोजी सीएनजी ४५.५ रुपये किलोग्रॅम दराने विकला जात होता.
- १७ डिसेंबर २०२२ रोजी सीएनजी ७९.५६ रुपये किलोग्रॅम झाला आहे.
- गेल्या १४ महिन्यांत सीएनजी प्रति-किलोग्रॅम ३४.०६ रुपयांनी महागला आहे.
- दरवाढीमुळे व्यावसायिक वाहनधारक तसेच खासगी सीएनजी वाहनधारक नाराज झाले आहेत.
पीएनजीच्या किंमतीत ९१% वाढ!
- ऑक्टोबरमध्ये, आयजीएलने घरगुती स्वयंपाकासाठी पीएनजीचा दर दिल्लीत ५०.५९ रुपये प्रति स्कीम वरून ५३.५९ रुपये प्रति मानक घनमीटर केला होता.
- ऑगस्ट २०२१ पासून पीएनजी दरांमध्ये झालेली ही १०वी वाढ होती.
- किंमती २९.९३ रुपये प्रति SCM किंवा सुमारे ९१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
- नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेरसारख्या इतर शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढवण्यात आल्याचे आयजीएलने त्यावेळी सांगितले होते.
- पीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या घरच्या बजेटवरही परिणाम झाला आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किंमतीमागचे कारण काय?
- गेल्या एका वर्षात सीएनजी ७० टक्क्यांनी महाग झाला आहे.
- या वर्षी नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली विक्रमी वाढ हे त्याचे प्रमुख कारण आहे.
- त्यामुळे सीएनजी आणि पीएनजी दिवसेंदिवस महाग होत आहेत.
- रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यांच्या दरम्यान जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशिया हा नैसर्गिक वायूचा मुख्य पुरवठादार आहे.
- सीएनजीच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती पाहता आता त्याचा वापर कमी होताना दिसत आहे.
- किंमती वाढल्यानंतर फक्त ९ ते १० टक्के वाहने सीएनजी वापरत आहेत.
- पूर्वी जवळपास १६ टक्के वाहने सीएनजीवर चालत होती.
- डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीत फारच कमी फरक असल्याने लोक आता सीएनजी वाहनांपेक्षा डिझेलवर चालणारी वाहने वापरण्यास प्राधान्य देत आहेत.
समितीची सीएनजी स्वस्त ठेवण्याची सूचना!!
- गॅसच्या किंमतींशी संबंधित, किरीट पारीख समितीने सीएनजीवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस सरकारला केली होती.
- नैसर्गिक वायूच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत येईपर्यंत सरकारने सीएनजीवर उत्पादन शुल्क आकारणे थांबवावे
- त्यामुळे गॅसच्या वाढत्या किंमतींपासून जनतेला दिलासा मिळणार आहे.