मुक्तपीठ टीम
देशात सध्या सणासुदीचा काळ असताना पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लि. (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय, पाइप्ड कुकिंग गॅस (PNG) च्या किमतीत प्रति युनिट ४ रुपये (SCM) वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरातील स्वयंपाक करणं आणमि बाहेर गाडीनं प्रवास करणं महागलं आहे.
मुंबईत सीएनजी ८६ रुपये-
- मुंबई आणि परिसरातील वाहनांसाठी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किरकोळ किंमत ८६ रुपये प्रति किलो झाली आहे.
- घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम ५२.५० रुपये असेल.
- सरकारने १ ऑक्टोबरपासून गॅसच्या किमती ४० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे.
३० सप्टेंबर रोजी, पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत पेट्रोलियम किंमत आणि विश्लेषण सेलने १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतींमध्ये ४० टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती.
यापूर्वी १ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय किमतीचा हवाला देत गॅसच्या किमतीत ११० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
सरकार वर्षातून दोनदा १ एप्रिल आणि ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या किमतीत सुधारणा करते. एमजीएलने म्हटले आहे की, या दरवाढीनंतर सीएनजी आणि पेट्रोलमधील किमतीतील बचत ४५ टक्क्यांवर आली आहे. त्याच वेळी, पीएनजी आणि एलपीजीमधील हा फरक केवळ ११ टक्क्यांवर आला आहे.