मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आ. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात केला आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली आहे, ते पत्र परमबीर सिंग यांच्या सरकार दफ्तरी असलेल्या ई-मेलआयडीऐवजी वेगळ्याच ईमेलने, सहीशिवाय आल्याने मुख्यमंत्री कार्यालय त्याची चौकशी करत आहे. मात्र, त्याचवेळी परमबीर सिंह यांची सही असलेल्या पत्राची प्रतही समोर आली आहे. दरम्यान, तो ईमेल आयडी आपलाच असल्याचे परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राबद्दल चौकशी
- ‘गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ईमेलवर २० मार्च दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे.
- paramirs3@gmail.com या ईमेल अॅड्रेसवरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेल्या आणि स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल अॅड्रेस तपासून घेण्यात येत आहे.
- परम बीर सिंग यांच्याशी गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल अॅड्रेस parimbirs@hotmail.com असा आहे.
- त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे.
वेगळ्या ईमेल आयडीवरून त्या पत्रावरच शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच ही शंका उपस्थित करण्यात आली असून, मुख्यमंत्री कार्यालयाला मिळालेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने पत्राची शहानिशा सुरु केली असली तरी त्याचवेळी परमबीर सिंह यांची सही असलेल्या पत्राची प्रतही समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असले तरी त्याला फार महत्व येईल असे वाटत नाही, असे मत प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी पत्र बाहेर आल्यानंतर जर ते खोटं असतं तर परमबीर सिंह यांनी स्वत:च पुढे येऊन तसं सांगितलं असतं. पण त्यांनी तसे केलेले नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे.
‘तो’ ई-मेल माझाच! – परमबीर सिंह
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र ज्या ईमेल आयडीने पाठवले तो ईमेल आयडी माझाच असल्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना स्पष्ट केले आहे.