मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्याने महाराष्ट्रातील राजकारण हादरलं आहे. त्यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. या बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत आघाडीतून बाहेर निघून भाजपासोबत पुन्हा युती करण्याची मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी धुडकावून लावली आहे.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व नगरसेवक आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मूळं आहेत. तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे, असे म्हटले. पुढे ते म्हणाले की, ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करु शकत नाही. त्यांनी जावं, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही. भाजपासोबत जावं यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मी शांत आहे षंढ नाही.