मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोरोनाच्या काळात चांगलं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढली आहे.’प्रश्नम’ या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले असून आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.
प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्य निवडली होती. यात हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. १३ राज्यात मिळून एकूण १७ हजार ५०० जणांनी आपले मत नोंदवलं आहे. त्यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे सर्वात पुढे असल्याचे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्री-
- लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे सर्वात पुढे आहेत.
- मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर ४४ टक्के मतांनी दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आहेत.
- तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून त्यांना ४० टक्के मतं मिळाली आहेत.
- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौथ्या तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी आहेत.
हे मुख्यमंत्री लोकप्रिय नाहीत-
- सर्वेक्षणात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ६० टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असल्याचे सांगितले आणि त्यांना पुन्हा निवडूण देणे त्यांना पसंत नाही, असे ते म्हणाले.
- केवळ १५ टक्के लोकच अमरिंदर यांच्या कारभारावर समाधानी आहेत पण पुन्हा त्यांना मत देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
- उत्तराखंडचे प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे, कारण राज्यात नुकतेच एक नवीन मुख्यमंत्री आले आहेत.
- एका वर्षाच्या आत राज्याला तिसरे मुख्यमंत्री मिळाले आहेत.
- उत्तराखंडमध्ये भाजपने नेतृत्वबदल केला आहे.
- मात्र आधीचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्याबद्दल या सर्वेक्षणात तब्बल ८० टक्के मते नकारात्मक होती.
- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबाबत नकारात्मक मते नोंदवली गेली आहेत.