मुक्तपीठ टीम
संयमी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आक्रमक झाले आहेत. गेले काही दिवस भाजपा आणि मनसे नेत्यांकडून त्यांना वैयक्तिक लक्ष्य केलं जात आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत थेट संवादाला सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना चेतवत शिवसंपर्क अभियानातून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करत असतानाच दुसरीकडे विरोधकांना सडेतोड उत्तरं देण्यास सुरुवात केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. गुढीपाडव्याच्या सभेपासून ते औरंगाबाद सभेमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा छेडला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही १४ मे रोजी जाहीर सभेची घोषणा केली आहे. त्यावेळी काय तो सवाल-जवाब होऊनच जाऊ दे, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रौप्य महोत्सवात बोलत होते.
मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हते…
- राजकारणात देशाचे शत्रू बाजूला पडले आहेत.
- पण पक्षाचे शत्रू कोण याकडे बघितले जात आहे.
- खालच्या दर्जाचे राजकारण सुरू झाले आहे.
- मुख्यमंत्री होणे हे माझे स्वप्न कधीच नव्हते. पण मुख्यमंत्री माझ्या शिवसेनेचा होईल हेच माझे स्वप्न होते.
- मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो.
- आता मी असेपर्यंत मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होत राहील, हेही माझं स्वप्न आहे.
- ते स्वप्न तुम्ही पूर्ण कराल.
- आव्हानं येत आहेत.
- आव्हान आणि नवीन गोष्टी आपल्या देशात बघायला मिळत आहेत.
- भविष्य अंधारात जाणार असेल तर आता तुम्ही कामाला लागले पाहिजे.
- दमदार वाटचाल सुरू असताना आता थांबायचे नाही.
त्यावेळी काय तो सवाल-जवाब होऊनच जाऊ दे…
- मी माझा उत्साह वाढवायला चाललो आहे.
- कारण दमदार वाटचाल सुरू असताना मलासुद्धा जरा हुरूप येतो.
- कारण मी हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात केली आहे.
- येत्या १४ तारखेला सभा घेतच आहे. त्यावेळी काय तो सवाल-जवाब होऊनच जाऊ दे.
- कारण किती दिवस ऐकत बसायचे.
- दुसरी बाजूही कळू दे
संजय राऊतांचा राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात वेगळा हुंकार
- शिवसेना नेते संजय राऊत रविवारी पुण्यातील शिरुर मतदारसंघात होते.
- गेले काही महिने राष्ट्रवादीनं लोकसभेला शिवसेनेकडून हिरावून घेतलेल्या या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष सुरु आहे.
- तेथे क्रिकेट सामान्याच्या उद्घाटनप्रसंगी संजय राऊतांनी प्रत्यक्ष मैदानातही आणि शाब्दिक चौकार-षटकार मारले.
- ते म्हणाले, शिरुर मतदारसंघातून पुढचा खासदार शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच असतील.
- संजय राऊतांचा हा पवित्राही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नव्या आक्रमक रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जाते.