मुक्तपीठ टीम
कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक असून कोरोनावर मात करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सद्भावना जीवनरथ लसीकरण दोनशे वाहनांच्या हस्तांतरण समारंभाप्रसंगी केले.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना जीवनरथ दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महापारेषण कंपनीतर्फे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी २५ कोटी रुपयांचा सीएसआर निधी विदर्भ सहायता सोसायटीला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या लसीकरण वाहनांचे हस्तांतरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर तसेच दृकश्राव्य पद्धतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, इतर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आमदार राजू पारवे, महापालिकेचे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला आदी उपस्थित होते.
कोरोनासोबतच अतिवृष्टी व पुरासारख्या संकटाचा सामना करताना जनतेच्या संरक्षणाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात ५ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. एका दिवशी ९ लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले असून केंद्र शासनातर्फे जेवढे जास्त डोस उपलब्ध होतील त्यानुसार सर्वांना लस देण्यात येईल. लसीकरण केंद्रांपर्यंत पोहचू शकत नाहीत, अशा नागरिकांचे घरी जावून लसीकरण करण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपयुक्त ठरणार आहेत. लसीकरणासाठी संपूर्ण मदत देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरण वाहनांचे हस्तांतरण व मोहिमेचा शुभारंभ करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सद्भावना जीवनरथाच्या माध्यमातून विदर्भातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी लसीकरण वाहने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संत गाडगे महाराजांचा संदेश अंमलात आणून मेळघाट, गडचिरोली यासारख्या अतिदुर्गम भागात पोहोचून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. ऊर्जा विभागाच्या दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध करुन देण्याचा देशातील व राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून राजीव गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच सद्भावना दिनी आयोजित होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेच्यासंदर्भात लसीकरण महत्त्वाचे असून जनतेला या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी दोनशे लसीकरण वाहने उपलब्ध केल्याबद्दल विदर्भ सहायता सोसायटी व महापारेषणचे विशेष अभिनंदन केले. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोरोनाचा प्रोटोकॉल तंतोतंत पाळला जाईल याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन केले.
महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी सद्भावना दिनी कोरोनावर मात करण्यासाठी तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ऊर्जा विभागातर्फे दोनशे वाहने उपलब्ध करुन दिलेत. ही खऱ्या अर्थाने राजीव गांधी यांना श्रद्धांजली ठरणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण वाढवण्याला या अभियानामुळे चालना मिळणार असे यावेळी त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी लसीकरणाचा वेग वाढविताना केंद्र शासनाने लसीचा पुरवठा वाढवावा, अशी सूचना करताना शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याला ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य विभागाला ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण अत्यंत आवश्यक असल्यामुळे महापारेषण कंपनीतर्फे २५ कोटी रुपयांचा सीएसआर निधी विदर्भ सहायता समितीला उपलब्ध करुन दिल्यामुळे नागपूर व अमरावती विभागातील सर्व तालुक्यांना प्रत्येकी दोन वाहने याप्रमाणे दोनशे वाहने देण्यात येत आहेत. या वाहनांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच वाहनाची देखभाल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियंत्रण अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच लसीकरणासाठी वापराचा नियमित अहवाल विभागीय आयुक्तांनी घ्यावा, अशी सूचना ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी केली.
प्रारंभी सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलीत करुन दोनशे सद्भावना जीवनरथाचे हस्तांतरण केले. नागपूर विभागासाठी १२८ लसीकरण वाहनांचे हस्तांतरण विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांना तर अमरावती विभागासाठी ७२ लसीकरण वाहनांचे हस्तांतरण महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांना करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी तर आभार जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपायुक्त आशा पठाण यांनी केले.
यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार दिनानाथ पडोळे तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागपूर व अमरावती विभागाचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.