मुक्तपीठ टीम
“नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता सिडकोने आजतागायत केलेले काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे”, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनी काढले. सिडको महामंडळाने नवी मुंबईतील कळंबोली आणि मुंबईतील कांजूरमार्ग येथे उभारलेल्या कोरोना समर्पित आरोग्य केंद्रांचे ई-लोकार्पण आणि सिडकोने आयोजित केलेल्या सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीटचे ई-अनावरण दूरस्थ पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, रायगड पालकमंत्री आदिती तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर, कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिका, प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री, नगरविकास, श्रीरंग बारणे, खासदार, राजन विचारे, खासदार, मनोज कोटक, खासदार, बाळाराम पाटील, विधानपरिषद सदस्य, प्रशांत ठाकूर, आमदार, सुनील राऊत, आमदार यांसह इकबाल सिंह चहल, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका, राजेंद्र धयाटकर, मुख्य अभियंता (नमुंआंवि), सिडको आणि सिडकोतील विभाग प्रमुख व अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सिडकोने अल्पावधीत कोरोना समर्पित आरोग्य केंद्रे उभारल्याबद्दल सिडकोचे अभिनंदन केले. तसेच सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीट यासारख्या कार्यक्रमांमुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक चांगली दिशा मिळून हे शहर गुंतवणूकदारांना आणि नागरिकांना आकर्षित करणारे शहर बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कांजूरमार्ग व कळंबोली येथे सिडकोकडून उभारण्यात आलेली कोरोना समर्पित आरोग्य केंद्रे ही आपण कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढण्यास सदैव सज्ज आहोत, याची निदर्शक असल्याचे सांगत सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिटच्या माध्यमातून सिडको नवी मुंबईमध्ये करीत असलेली विकासकामे सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला.
एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे तथा मंत्री, नगर विकास यांनी या प्रसंगी अल्प काळात कळंबोली आणि कांजूरमार्ग येथे सुसज्ज अशी कोरोना समर्पित आरोग्य केंद्रे विकसित केल्याबद्दल सिडकोचे अभिनंदन करून, सिडकोकडून राबविण्यात येणारे विकास प्रकल्प राज्याच्या विकासातही योगदान देणारे ठरतील, असे मत व्यक्त केले. तसेच सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिटच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर वाव असल्याचे अधोरेखित होत आहे, असेही ते म्हणाले.
रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या प्रसंगी बोलताना कळंबोली येथील कोरोना समर्पित आरोग्य केंद्राच्या रूपाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरिता एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध झाले असल्याचे सांगून या केंद्रात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक रुग्णांकरिता स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात कोविड समर्पित आरोग्य केंद्रांद्वारे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली तसेच सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिटद्वारे नवी मुंबईकडे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आकर्षित होतील, असा विश्वास व्यक्त केला.
एप्रिल २०२१ च्या सुमारास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने सिडकोला नवी मुंबईतील कळंबोली येथील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये ६३५ खाटांचे आणि मुंबईतील कांजूरमार्ग येथील ओल्ड क्रॉम्प्टन ग्रीव्हज फॅक्टरी येथे १७३८ खाटांचे कोरोना समर्पित आरोग्य केंद्रे उभारण्याचे निर्देश दिले होते. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार त्वरेने कार्यवाही करीत सिडकोने विक्रमी वेळेत या कोरोना आरोग्य केंद्रांची उभारणी केली.
कळंबोली येथील कोरोना आरोग्य केंद्र पूर्णपणे वातानुकूलित असून या केंद्रामध्ये एकूण ६३५ खाटा असून त्यात ५०५ ऑक्सिजनयुक्त खाटा, १२५ आयसीयू खाटा, (यातील २५ आयसीयू खाटा लहान मुलांसाठी समर्पित आहे), तसेच ५ खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव असणार आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी २४ खाटांचे मदर लाउंज सुद्धा प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे, संपर्क रहित तपासणी कक्ष, डॉक्टर आणि रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग, रूग्णांच्या देखरेखीसाठी आणि उपचारांसाठी हे आरोग्यकेंद्र सीसीटीव्ही, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम, आवश्यक आयटी इन्फ्रास्ट्रक्चर व वायफाय प्रणाली इ. सुविधाही विकसित करण्यात आल्या आहेत. कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्रामध्ये १,७३८ खाटांपैकी ऑक्सिजनयुक्त ११५६ खाटा, ३७२ विलगीकरण खाटा, तसेच १० खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव असणार आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ४४ खाटांचे मदर लाउंज सुद्धा प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे २१० अतिदक्षता खाटा असून यातील ५० आयसीयू खाटा लहान मुलांसाठी समर्पित आहे. सदर कोविड केंद्रांचे ई-लोकार्पण करण्यात येऊन सिडकोकडून या केंद्रांचे संबंधित महानगरपालिकांना हस्तांतरण करण्यात आले आहे.
सिडकोने आयोजित केलेल्या सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीट (व्हर्च्युअल-आभासी) नवी मुंबईतील गुंतवणुकीच्या विविध संधी, नवी मुंबईचे वर्तमान आणि भविष्य, नवी मुंबई हे गुंतवणुकीसाठी आदर्श शहर का आहे, नवी मुंबईतील आरोग्य, शिक्षण, क्रीडा व परिसंस्था, नवी मुंबईला लाभलेली परिवहन संधानता, अशा विविध विषयांवर चर्चा करत तज्ज्ञांनी आपले विचार मांडले.
या ई-लोकार्पण आणि ई-अनावरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी तर सूत्रसंचालन प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको यांनी केले.