मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे आमदार, नगरसेवक आणि आता खासदार फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष्य आता संपूर्ण शिवसेना ताब्यात घेण्याचं आहे. एकनाथ शिंदें गटाने आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला द्यावे आणि आपल्यालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. न्यायालयीन लढाई सुरु असतानाच या दाव्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात नवा सामना रंगण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंचं निवडणूक आयोगाला पत्र!!
- एकनाथ शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे.
- या पत्रात एकनाथ शिंदे गटाने आपल्यालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
- आमच्याकडे दोन तृतीयांश संख्याबळ आहे.
- ५० आमदार आणि १२ खासदारही आमच्याकडेच आहेत.
- त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
- तसेच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, मुख्य नेते हे नवे पद निर्माण करण्यात आल्याची माहितीही या याचिकेत देण्यात आली आहे.
- तसेच नव्या कार्यकारिणीने निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
शिंदे गटाच्या पत्राआधीच शिवसेनेनेकडून निवडणूक आयोगाला पत्रं!!
- शिंदे गटाच्या या पत्राआधीच शिवसेनेनेही निवडणूक आयोगाला एक पत्र दिलेलं आहे.
- शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली होती.
- त्यात आता शिंदे गटाकडून दाव्याचं पत्रं आल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.