मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद विकोपाला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध शिवसेना वाद हाणामारीवर उतरला आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेना भिडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप आमदार सुनील शिंदे यांनी केला. याबाबत आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आरोपांचे खंडण केले आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरून आता मनसेनं शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
नेमकं काय घडलं?
- गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता.
- मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटानेदेखील आपला मंच उभारला होता.
- या मंचावरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले.
- शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला.
- यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
- अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद काहीसा कमी झाला.
- यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
- यावरून शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
मनसेने उडवली शिवसेनेची खिल्ली!!
- या सगळ्या प्रकरणावरून आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे.
- मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे.
- दादर, माहीम, प्रभादेवी हे एक सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही.
- पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.
- शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय.
- तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला.
- माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून.
- ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचं स्टेटमेंट नाही, काही नाही.
- गेल्या अडीच वर्षांत अशा अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकांवर टाकल्या.
- त्यामुळे जे पेरलंय, ते उगवतंय.