मुक्तपीठ टीम
सिडको महामंडळाने साडे बारा टक्के योजने अंतर्गत नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांना किंवा त्यांच्या वारसांना करण्यात येणारे जमिनीचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून सिडकोचे मुख्यालय असलेल्या, सिडको भवन येथील सातव्या मजल्यावरील साडे बारा टक्के योजना कार्यालयाचे स्थलांतर तळ मजल्यावर करण्यात आले आहे. या विभागाचे उद्घाटन १८ ऑक्टोबर २०२१ रोजी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, अजिंक्य पडवळ, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी व अन्य अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.
“नवी मुंबई प्रकल्पबाधितांना संपादित जमिनींकरिता योग्य मोबदला देण्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता साडे बारा टक्के योजना ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. येत्या दीड वर्षात या योजने अंतर्गत बाकी असलेले जमिनीचे वाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने आखले आहे. याकरिता सदर योजनेतील प्रकरणे अधिक वेगाने मार्गी लावण्यात येणार आहेत,” असे डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.
नवी मुंबई विकसित करण्याकरिता शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोची १९७० मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली होती. नवीन शहर विकसित करण्याकरिता सिडकोकडून स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पबाधितांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा याकरिता साडे बारा टक्के ही अभिनव योजना अस्तित्वात आली. या योजने अंतर्गत नवी मुंबई प्रकल्पबाधितांना मोबदला म्हणून त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या साडे बारा टक्के विकसित जमीन देण्यात येते.
सिडकोकडून अत्यंत पारदर्शक व नियोजनबद्धरीत्या ही योजना राबविण्यात येऊन, आजतागायत नवी मुंबई क्षेत्रातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील बहुतांशी प्रकल्पबाधितांना किंवा प्रकल्पबाधित व्यक्ती हयात नसल्यास त्यांच्या वारसांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पबाधितांना या योजने अंतर्गत जमीन वाटपाची प्रक्रिया येत्या दीड वर्षात सिडकोकडून पूर्ण करण्यात येणार आहे.
सिडकोकडून द्रोणागिरी नोडमधील जमिन संपादित करण्याचे काम सुरू असून सदर जमिनींच्या मोबदल्यात तेथील प्रकल्बाधितांना जासई येथे विकसित भूखंड प्रदान करण्यात येतील. यासाठी जासई येथे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
साडे बारा टक्के योजने संदर्भातील कामांसाठी सिडको मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीचे पडावे म्हणून, या योजनेचे सिडको भवन इमारतीत असलेले सातव्या मजल्यावरील कार्यालय तळ मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले असून नवीन कार्यालय हे सुसज्ज व अधिक प्रशस्त जागेत असून कार्यालयाबाहेर आसन व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प इ. सुविधा आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनाही हे नवीन कार्यालय अधिक सोयीचे पडणार आहे.