मुक्तपीठ टीम
भूखंडाकरिता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर करून घेण्याकरिता भराव्या लागणाऱ्या अतिरिक्त अधिमूल्यावर प्रवर्तकांना (प्रमोटर्स) रिव्हर्स चार्ज मेकॅनिझनमचा लाभ घेता येईल असा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे.
सिडको व्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केली भूमिका
- सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममागील भूमिका मांडली आहे.
- कोरोनामुळे प्रतिकूलतेला सामोरे जावे लागलेल्या बांधकाम क्षेत्रास चालना देण्याकरिता सिडको सातत्याने प्रयत्नशील आहे.
- प्रवर्तक विकासकांना अतिरिक्त अधिमूल्यावर जीएसटी भरावा लागू नये हा प्रयत्न आहे.
- जीएसटी अधिनियमाच्या अंतर्गत त्यांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा पर्याय निवडल्यास त्यांना या पर्यायाच्या अंतर्गत लाभ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
- यामुळे विकासकांवरील आर्थिक भार बऱ्याच अंशी कमी होणार आहे.
महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक विकास आणि प्रोत्साहन नियमावली २०२० (युडीपीसीआर २०२०) धोरण संपूर्ण नवी मुंबईसह सिडको अधिकारक्षेत्राला लागू होत असल्याने या धोरणांतर्गत भाडेपट्टाधारकाकडून अतिरिक्त अधिमूल्य आकारून, भूखंडाकरिता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याची तरतूद आहे. यानुसार सिडकोकडून नवी मुंबईमध्ये वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांकरिता अनुज्ञेय अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याकरिता जीएसटीसह अतिरिक्त अधिमूल्य आकारण्यात येते. परंतु काही प्रवर्तक अर्जदारांनी अतिरिक्त अधिमूल्यावर जीएसटी आकारण्यात येऊ नये, याबाबतची विनंती सिडकोला केली होती.
या संदर्भात सिडकोकडून जीएसटी तज्ज्ञ सल्लागारांबरोबर विचारविनिमय करण्यात आला. सदर तज्ज्ञांनी केलेल्या सूचनेनुसार, संबंधित भूखंडावर निवासी बांधकाम प्रकल्प किंवा कोणताही बांधकाम प्रकल्प विकसित करून त्याची खरेदीदारांना विक्री करू इच्छिणाऱ्या प्रवर्तकाकडून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकावर आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त अधिमूल्यावर सिडकोला जीएसटी आकारण्याची व संकलित केलेला जीएसटी कर यंत्रणांना अदा करण्याची आवश्यकता नाही. या ऐवजी अधिसूचना क्र. ०४/२०१९ आणि ५/२०१९ सीजीएसटी रेट नुसार, संबंधित प्रवर्तक हे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कर भरू शकतात, अशी सूचना तज्ज्ञ सल्लागारांकडून करण्यात आली.
रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रवर्तक अर्जदारांनी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्जदारांकडून आपण उपरोक्त जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा लाभ घेण्यास पात्र असल्याची पुष्टी देणारी विनंती करण्यात यावी. अर्जदारांकडून रेरा अधिनियम २०१६ नुसार आपण प्रवर्तक असल्याची पुष्टी करण्यात यावी. अर्जदारांनी ५०० रुपयांच्या न्यायिकेतर स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तथा वचनपत्र सादर करून, अधिसूचना क्र. ०४/२०१९ आणि ०५/२०१९ सीजीएसटी रेट नुसार रिव्हर्स चार्ज मेकॅनिझन अंतर्गत आपण आपले जीएसटी दायित्व निभावणार असल्याबाबत पुष्टी द्यावी.
तरी लवकरात लवकर उपरोक्त आवश्यक बाबींची पूर्तता करून अधिकाधिक प्रवर्तकांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत देण्यात येणाऱ्या जीएसटी सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.