मुक्तपीठ टीम
चीनमध्ये कोरोनाची स्थिती अगदी चिंताजनक होत चालली आहे. दिवसेंदिवस संसर्गाचे प्रमाण आणि रूग्ण संख्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत चीन सरकारने पुन्हा एकदा झिरो कोरोना पॉलिसी लागू केली आहे. काही शहरांमधील परिस्थिती अशी आहे की, तेथील लाखो लोकांना त्यांच्या घरात कैद करून ठेवण्यात आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर ३.५ दशलक्ष लोकांना घरात कैद करण्यात आले आहे. त्यांच्या घरी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परंतु, सरकारच्या या पॉलिसीमुळे व्याकूळ झालेल्या जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.
चीनच्या जनतेचा संताप अनावर… आंदोलन करण्यास रस्त्यावर!
- मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या शांघायमध्ये अनेक आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी झिरो कोरोना पॉलिसी मागे घेण्याची मागणी केली.
- चीनमधील उरुमकी शहरातील एका इमारतीला आग लागल्याने हे निदर्शन सुरू झाले, ज्यामध्ये १० लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले.
- असे म्हटले जात आहे की, येथे झिरो कोरोना पॉलिसी लागू झाल्यामुळे मदत कार्यात विलंब झाला, ज्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली.
आंदोलकांचा शी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाला विरोध!
- चीनमध्ये सरकारच्या या कठोर पॉलिसीला विरोध करणाऱ्या आंदोलकांचे अनेक व्हिडीओही समोर येत आहेत.
- व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, उरुमकी शहरातील रस्त्यांवर अनेक लोक दिसत आहेत आणि हे लोक चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाचा विरोध करत आहेत.
- याशिवाय लोक म्हणत आहेत की, त्यांना पीसीआर चाचणी नको, स्वातंत्र्य हवे आहे. ते शिनजियांग शहरातील लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करत आहेत.
- अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये संसर्गामुळे मृत्यूची प्रकरणे कमी आहेत, परंतु तरीही देशाच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने या विषाणूबाबत कोणताही हलगर्जीपणा न करण्याचे धोरण स्वीकारले आहे, ज्या अंतर्गत या भागात रुग्णांची संख्या वाढली आहे.