मुक्तपीठ टीम
जगभरात वाखाणणी झालेला चीनमधील काचेचा पूल तुटल्याची (की फुटल्याची म्हणावं?) बातमी आहे. हा पूल कधीच तुटणार नाही, असा दावा बनवणाऱ्या इंजिनीअर्सनी केला होता. मात्र, हा दावा आता फोल ठरला आहे. हा पूल तुटल्याची माहिती समोर येत आहे. सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्याच्या तडाख्यात हा पूल आला असून यावरील काही ठिकाणाच्या काचांचे पॅनल तुटले असून या दुर्घटनेमुळे पूलावर एक तरुण अडकला होता. या अपघाताचे फोटो सध्या चिनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहेत. त्यामुळे आता या काचेच्या पूलाच्या मजबूतीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चीनमधील प्रसिद्ध काचेच्या पूल
• हा पूल चीन येथील लाँगजिंग शहराच्या पियान पर्वतावर असलेल्या रिसॉर्टमध्ये आहे.
• हा काचेचा पूल जितका रोमांचक आहे तितकाच तो भयावहसुद्धा आहे.
• “हा पुल जरी काचेचा बनवला असला तरी कधीच तुटणार नाही, फुटणार नाही”, असा दावा इंजिनीअर्स कडून करण्यात आला होता.
• बनवणाऱ्यांचा हा दावा आता काचेसारखाच तुटला-फुटला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोत काय?
• चिनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक तरुण ३३० फूट उंचीच्या या काचेच्या पूलावर कसा तरी आपला जीव वाचवताना दिसत आहे.
• जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिथे ९० कमी वेगाने वारे वाहत होते.
• त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी या तरुणांनी तुटलेल्या पूलाच्या रेलिंगला पकडलेले दिसत आहे.
• एका स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार; तो तरुण तुटलेल्या काचेच्या पूलावर काही काळ अडकला होता.
• अग्निशमन जवान, पोलीस आणि पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले.
त्या तरुणाला पूलावरुन बाहेर काढतात त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याचे काउंसीलिंग केले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर हा पूल काही काळासाठी बंद ठेवला होता. तसेच या काचेच्या पूलाची लांबी ४३० मीटर आणि रुंदी सहा मीटर एवढी आहे.