मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका खासगी बालसंगोपन केंद्राच्या संचालकाला काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता आणखी पाच मुलींनीही त्यांच्यासोबत लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्रातील आश्रमशाळा आणि अन्य आश्रयगृहांमधील मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
राज्यभरात आश्रमशाळा, आश्रयगृहांना सुरक्षेची गरज!
- राज्यात आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा निवासी अनिवासी चालवल्या जातात.
- यात अनेक ठिकाणी गैरप्रकाराच्या तक्रारी नेहमीच येत असतात.
- ज्या नाशिकमध्ये अत्याचाराच्या घटना उघड झाल्या, त्याच नाशिकमध्ये त्र्यंबक रस्त्यावरील आधारतीर्थ आधार आश्रमातील चार वर्षीय मुलाच्या खुनाची घटना घडली होती.
- या आश्रमशाळांमध्ये लोकल नियंत्रण नसलेले मंत्रालयामधून नियंत्रित सीसीटीव्ही यंत्रणा, अॅक्सेस कार्ड सिस्टम बसवण्याची मागणी होत आहे.
आताचं नेमक प्रकरण काय?
- पहिली घटना १३ ऑक्टोबर रोजी म्हसरूळ येथील बाल निवारागृहात घडली.
- २३ नोव्हेंबरला मुलीने तक्रार केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.
- त्या आधारे २८ वर्षीय संचालकाला अटक करण्यात आली.
- आरोपीने १४ वर्षीय पीडितेला इमारतीच्या पार्किंग एरियातील एका तात्पुरत्या टिन रूममध्ये बळजबरीने नेले.
- त्याने तिला तिच्या मोबाइल फोनवरून एक अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
आणखी पाच मुलींची पोलिसांसमोर कबुली…
- भारतीय दंड संहिता (IPC), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
- आता आणखी पाच मुलींनी पोलिसांसमोर येत सांगितले की, त्यांच्यावरही आरोपींनी लैंगिक अत्याचार केला होता.
- त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालाची प्रतीक्षा आहे.
- ज्या घरातून निवारा चालवला जात होता, त्या घराच्या मालकाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
- आरोपी ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असून नवीन जबाब व आरोपांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे.