मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे आता लवकरच १२ ते १४ वर्षांच्या मुलांनाही ही लस मिळणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही केंद्र सरकारला बारा वर्षांच्या पुढील मुलांचे लसीकरण सुरू करा, अशी मागणी केली होती. सध्या केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे ज्यांचे वय १७ वर्ष पूर्ण झाले आहे, पण १८ संपलेले नाही त्यांना लस देण्यात येत आहे. एनटीएजीआय ग्रुपचे प्रमुख डॉ. एनके अरोरा म्हणाले की, मार्चपासून या मुलांना लस दिली जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सध्या १५ ते १७ वर्षांच्या मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे.
डॉ. अरोरा हे लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोरोना कार्यगटाचे अध्यक्ष आहेत.अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ ते १७ वर्षे वयोगटातील ३० दशलक्षाहून अधिक मुलांना देशात कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. अवघ्या १३ दिवसांत या वयातील सुमारे ४५% मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले.
“जानेवारीच्या अखेरीस १५ ते १७ वयोगटातील ७.४ कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळेल. यानंतर, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आम्ही या मुलांना दुसरा डोस देण्यास सुरुवात करू आणि महिन्याच्या अखेरीस प्रत्येकाला लसीचा दुसरा डोस मिळेल. त्यानंतर आम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून १२ ते १४ वर्षांच्या मुलांना लस देणे सुरू करू शकतो.” असे डॉ. एनके अरोरा म्हणाले.
तज्ञ म्हणतात की, १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुले प्रौढांप्रमाणेच असतात. त्यामुळे सर्वप्रथम १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अरोरा यांनी सांगितले. त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर या वयाखालील बालकांचे लसीकरण सुरू केले जाईल.
मुलांच्या लसीकरणाबाबतची माहिती
- १५ ते १७ वयोगटातील ४५% लोकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस मिळाला आहे.
- जानेवारीच्या अखेरीस ७.४ कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळेल.
- १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण फेब्रुवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणे अपेक्षित आहे.
- २ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, आपत्कालीन परिस्थितीत कोवॅक्सिनचा वापर सरकारने मंजूर केला आहे.
- काही तज्ज्ञांनी सांगितले की, ५ ते १४ वर्षे वयोगटातील लहान मुलांचे १२ ते १४ वर्षांच्या मुलांपूर्वी प्रथम लसीकरण करावे.