मुक्तपीठ टीम
पाकिस्तानमध्ये चिकनच्या किंमतीत अनपेक्षित वाढ झाल्याने कराची जनता निराश झाली आहे. कराचीमध्ये चिकनचा दर गगनाला भिडलेला आहेत. कराचीमध्ये चिकनचे दर काही दिवसातच प्रति किलो ५०० रुपयांवर पोहचले आहेत. पाकिस्तानात केवळ चिकनच महागले नसून अंडी आणि आल्याचे दरही वाढले आहेत. प्रति डजन अंडी ३५० रुपये तर एक किलो आले १००० रुपयांना विकले जात आहे. तसेच घरगुती गॅसच्या दरातही वाढ झाल्याने पाकिस्तानच्या सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे.
कराची येथील एका विक्रेत्याने सांगितले की, चिकनच्या किंमतीत झालेल्या वाढीचे मुख्य कारण चारा आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ आहे. यामुळे पोल्ट्री उत्पादनांचा खर्चही वाढला आहे. नुकसानाची भरपाई करण्यासाठी आम्हाला चिकनची किंमत वाढवावी लागत आहे. येत्या काही दिवसात चिकनची किंमत कमी होईल, असे विक्रेतांच्या संघटनांनकडून सांगितले जात आहे.
कराचीमध्ये जिवंत कोंबडीची किंमत ३७० रुपये प्रति किलो तर चिकनची किंमत ५०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये दर वाढल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तर लोहोरमध्ये चिकनची किंमत ३६५ रुपये प्रति किलो असल्याचे सांगितले जात आहे.
महागाईवर नियंत्रण आणण्यास इम्रान खान अपयशी
- गेल्या महिन्यात पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा (केपी) च्या बाजार समित्या रद्द केल्या.
- इम्रान यांनी इस्लामाबादमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणासंदर्भात बैठकीच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेतला होता.
- दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इम्रान खान यांनी ट्विट करून असा दावा केला होता की, आता त्यांच्या देशात साखर ८१ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
- त्यांनी स्वत: चे कौतुक केले आणि म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या धोरणांमुळे गेल्या महिन्यात प्रति किलो १०२ रुपये दराने विकल्या जाणाऱ्या साखरेची किंमत आता ८१ रुपयांवर आली आहे.
- पण आता सातत्याने पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तू्ंच्या दरात वाढ होत असल्याने इम्रान खान यांचे सरकार महागाई नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.