तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
छत्रपती शिवाजी महाराज.
जीवन जगावं तर कसं जगावं, त्याची प्रेरणा ज्यांच्या जीवनातून लाभते ते छत्रपती शिवाजी महाराज!
केवळ पोकळ अभिमान बाळगायचा नाही, तर सार्थ स्वाभिमान जागवत, नव्या विचारांची पेरणी करत ताठ मानेनं, स्वाभिमानी बाण्याची आपल्या जगण्यातून प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज!
पराक्रम असा की युगे युगे स्फुर्ती लाभेल. पहाडासारख्या दुष्मनाच्या सामर्थ्याला न बिचकता हिंमतीनं पण गनिमी काव्याच्या साथीनं त्याच्या छाताडावर पाय देऊन उभे ठाकणारे छत्रपती शिवाजी महाराज!
लोकशाही म्हटलं की पाश्चात्यांकडेच पाहण्याची आपली सवय आहे. पण जगातील इतर राजे, सम्राट, बादशहांप्रमाणे स्वत:च्या साम्राज्याची नाही तर रयतेच्या राज्याची, स्वराज्याची प्रत्यक्षात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज!
हा राजा काळाचा पुढचा होता. समाजसुधारक होता. जिजाऊ मांसाहेब सती कुप्रथेपासून दूर राहिल्या. हुंडा शापालाही विरोधच राहिला. मोगल सरदाराच्या सुनेला जसं सन्मानानं सुरक्षित धाडलं, तसंच स्त्रीयांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग करण्याची न्याय निष्ठुरही. हे सारं करणारे स्त्री समानतेचे, स्त्री हक्कांचे खरे रक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज!
सर्वात महत्वाचा गुण. राजानं…नेतृत्वानं कसं असावं ते सांगणारा. काहीही झालं तरी गाफिल राहायचं नाही. अखंड सावधान राहत अष्टावधान बाळगायचं. अष्टावधानी छत्रपती शिवाजी महाराज!
शेवटी जाता जाता. आजच्या सदा अस्वस्थ युगातील आपल्या प्रत्येकानं नक्कीच आठवावा असा, पण फारशी चर्चा न झालेला गुण. जो अनेक कठिण प्रसंगामध्ये तारणारा ठरला. महाराजांकडे स्वाभिमान होता. महाराजांकडे शौर्य होते. महाराजांकडे सामर्थ्यही होते. तेही असं की त्यांच्यासाठी प्राणांचे बलिदान करण्यासाठी मावळे सदैव आतुर असत. पण तरीही महाराजांनी जोपासलेला सर्वात मोठा गुण म्हणजे संयम! संयमाच्या बळावर अनेक आव्हानं महाराजांनी लिलया पेलली आणि अधळून लावली!
खरंतर महाराजांविषयी कितीही मांडलं तरी कमीच. थांबावंच वाटत नाही. जाता जाता महाराजांविषयी मनातील काही ओळी…
वारसा आम्हाला कुणाचा…
वारसा आपला पारतंत्र्य संपवत स्वराज्य स्थापणाऱ्या शिवबांचा
कधी काढला कोथळा, कधी छाटली बोटं, पण होताच सोबत गनिमी कावा
नाहीच तुकवली लाचारीनं मान, पण परिस्थितीनुसार मागेही आले दोन पावलं
पराक्रमानं बदलली परिस्थिती, तीन दशकं ओलांडली, तेव्हा झाले राजे छत्रपती!
तेव्हा झाले राजे छत्रपती!
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth