मुक्तपीठ टीम
देशात एकीकडे कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे लोकांच्या जीवाशी खेळत फसवणूक करणाऱ्या माफियांनाही उत आला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारानंतर आता कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देऊन फसवणुकीचे धंदेही सुरु झाले आहेत. मुंबईतील गुन्हे शाखेने दोन वेगळ्या घटनांमध्ये बनावट रिपोर्ट तयार करणाऱ्या आरोपींना जेरबंद केलं आहे. याआधीही एका कंपनीतील कामगारांचे बनावट कोरोना चाचणी रिपोर्ट तयार करणाऱ्या ठाण्यातील रॅकेटला जेरबंद करण्यात आलं होतं. त्यामुळे कोणालाही कोरोना चाचणी करायची असेल तर लॅबची विश्वसनीयता पडताळूनच करावी.
कोणतीही प्रयोगशाळा नसताना कोरोनाचे बनावट रिपोर्ट तयार करून लोकांना विकण्याच्या आरोपाखाली मुंबईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथून अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट -१०च्या पथकाला बनावट कोरोना रिपोर्टची खबर मिळाली होती. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी छापा टाकून हे रॅकेट उघडकीस आणले. बिलाल फारुख शेख (वय २४) आणि रशीद शकील शेख (वय ३२) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बनवत असत.
अशाच एका दुसऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या दुसऱ्या दोन युनिटनीही छडा लावला आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की ते, हे बनावट रिपोर्ट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांना पाठवत असत आणि अॅपद्वारे पैसे मागित असत. आयपीसी कलम फसवणूक आणि बनावटपणाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे.