मुक्तपीठ टीम
शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते; त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ आदी उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि विविध विद्यापीठे, राष्ट्रीय, राज्यपातळीवरील शिक्षण संस्था तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थासोबत सामजस्य करार करण्यात आले.
सामंजस्य करारांवरील स्वाक्षऱ्यांनंतर संस्थाचे अभिनंदन करुन चंद्रकांत पाटील म्हणाले, जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावत आहे. शैक्षणिक क्षेत्रातही देशपातळीवर चांगले काम होत आहे. चांगले काम करणाऱ्या संस्थेच्या पाठीमागे राज्य शासन भक्कमपणे उभे आहे. आपण शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्याचे आव्हानात्मक काम स्वीकारले असून त्यातून व्यक्तिमत्व विकासाचे काम होणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणातील संकल्पना समजून समाजापर्यंत पोहचिण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होणार आहे. प्रत्येक बाबींचे विश्लेषणात्मक सखोल मार्गदर्शन प्रशिक्षणातून मिळणार आहे. प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या कार्यपद्धती शिक्षकांना दिशादर्शक आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
डॉ. विनायक यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. विविध क्षेत्रातील संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून कराराप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी आयसर, कवी कुलगुरु संस्कृत विद्यापीठ, जेजे ग्रुप संस्था, फ्लेम विद्यापीठ, आयआयटी बॉम्बे, ललीत कला केंद्र, सिम्बॉयसिस विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, परिवर्तन ट्रस्ट, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, एक्सआरसीव्हीसी, मनोपचार आरोग्य संस्था, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, इनोव्हेटिव्ह ऑफ चेंज, गोंडवाना, हाय प्लेस, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयुका, टाटा इन्स्टियूट ऑफ सोशल सायन्सेस, फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट, रोटरी, विश्वकर्मा विद्यापीठ, इन्स्टियूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, आरआयआयडीएल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समीर आयआयटी गांधीनगर, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, एनएफबी खालसा कॉलेज, जीआयईईई सोबत सामंजस्य करार करण्यात आला.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालीनी फडणवीस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत भोकरे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत, रुसाचे सल्लागार विजय जोशी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.