मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आखल्या आहेत. या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवून आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्या, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.
पाली ( जि. रायगड ) येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या कोकणातील प्रवासाला पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याप्रसंगी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना महाराष्ट्रातील ४ जणांचा समावेश करत देशात महाराष्ट्राला सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले. मोदी सरकारच्या जन कल्याणकारी योजना जनतेपर्यंत नेण्याबरोबरच जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आणि आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा सुरु आहे. नारायण राणे यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या खात्याच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राच्या विकासाला नक्की चालना मिळेल.
केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताची मान जगात उंचावली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा जाणून घेऊन जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
आपल्यावर सोपविण्यात आलेल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून रोजगार वाढविणाऱ्या योजना आपण सुरु करू, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.