मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली. एकीकडे या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा दावा केला आहे. न्यायालयात शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील. शिंदे-फडणवीस सरकार धोक्यात येणार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं खैरे यांनी म्हटलं आहे. खैरे यांच्या या दाव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
- सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात.
- हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते.
- हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे.
- फडणवीस हुशार माणूस आहे.
- त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत.
- राज्यातील २२ नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत.
- पण काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे.
- त्यामुळे ते सध्या शांत आहेत.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी!!
- चंद्रकांत खैरे यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे.
- बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे.
- यामुळे ठाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
- म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव होईल.
- छगन भुजबळ, नारायण राणे पडले. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार.
- फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व ४० आमदारांचा पराभव होईल.
खैरे म्हणतात तसंच होईल?
दावा -१
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पहिल्या फेरीतील १६ सेना बंडखोर आमदार अपात्र ठरतील, असा दावा केला आहे. तो संविधानातील तरतुदी लक्षात घेता, अशक्य नाही. तसं घडू शकतं.
दावा -२
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसचे २२ आमदार फोडतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे. पण पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी लक्षात घेता ४४ सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसमध्ये कारवाई टाळण्यासाठी किमान ३३ आमदार फुटणे आवश्यक आहे. पदाचा राजीनामा देऊन लढण्याची सध्या तरी कुणाची तयारी नसणार. त्यामुळे २२ आमदार तसं करतील, अशी शक्यता कमी आहे. तरीही इर काही खोकेकारणामुळे तसं घडवलं गेलं तर ती खूपच दूरची शक्यता असली, तरी नाकारता येत नाही.
दावा – ३
एकनाथ शिंदे पराभूत होतील!
शिवसेनेतून फुटणारे नेते पराभूत होतात हा इतिहास आहे. खरं आहे. पण खैरे यांनी नाव घेतलेले नारायण राणे हे पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले नव्हते. उलट सत्तेची दहशत माजवत त्यांनी शिवसेना नेत्यांना कोकणात फिरणं अशक्य केलं होतं. ते शक्य झालं कारण प्रशासनाच्या साथीनं स्थानिक पातळीवरील राणेंची बांधणी मजबूत होती. पुढे उद्धव ठाकरेंच्या सतत प्रयत्नांमधील सातत्य आणि संघटनाबांधणीत ते कमी पडले.
शिंदेंचंही तसंच आहे. त्यांना न्यायालयाने लढण्यास मनाई केली तर भाग वेगळा. पण जर आज निवडणूक झाली तर ते पराभूतच होतील, असं समजणं जरा जास्त होईल. ते विजयी होण्याची शक्यता, आजच्या परिस्थितीत जास्त आहे.