मुक्तपीठ टीम
व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई करताना आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने चंदा कोचर, त्यांचे पती आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांची नावे नुपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडसह गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित आयपीसी कलमांतर्गत एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नोंदवली आहेत.
नेमका घोटाळा काय?
- व्हिडिओकॉन समूहाला २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले.
त्यानंतर लगेच व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी कोचर यांच्या न्यू पॉवरमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. - सीबीआयने २०१९ मध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर स्पष्ट केले होते की, आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटानुसार खासगी कंपन्यांना काही कर्ज मंजूर केले होते.
- ईडीने यापूर्वी ३,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.
- या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर चंदा यांना २०१८ मध्ये त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
- कोचरांना सीबीआयने फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
- सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा फौजदारी गुन्हा नोंदवून ईडीने सप्टेंबर २०२० मध्ये दीपक कोचर यांना अटक केली होती.
पत्नीने कर्ज दिले, पतीला गुंतवणुकीचं घबाड!
- ईडीचा आरोप आहे की चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसीआय बँकेच्या समितीने व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले.
- कर्ज मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने ८ सप्टेंबर २००९ रोजी न्यूपॉवरला ६४ कोटी रुपये वितरित केले.
- दीपक कोचर हे एनआरपीएलचे मालक होते.