डॉ.जितेंद्र आव्हाड
“अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं पाकुळलं…”
रंगमंचावर हे गीत सुरू असे. पायघोळ घेरदार पांढरा घागरा, खांद्यावरून ओढलेली लाल शाल, मस्तकी पगडी, छातीवर कवड्यांच्या माळा अशा वेशातले शाहीर विठ्ठल उमप त्यावर अभिनय करीत असत आणि महाराष्ट्राच्या भारूड परंपरेच्या गारूडाने अवघे प्रेक्षागार मंत्रमुग्ध होत असे.
द्रौपदीच्या मनात दडलेले कर्णाविषयीचे प्रेम आणि तिने त्याची दिलेली कबुली यांची करुण कथा सांगणाऱ्या ‘जांभूळ आख्याना’ची ही कथा. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील हे एक लेणेच. ते सादर करणारे विठ्ठल उमप म्हणजे महाराष्ट्राचा पहाडी आवाज; पण द्रौपदी वठवताना हाच शाहिरीतला सह्यगिरी लोण्याहून मऊ होऊन जात असे. त्यांच्या याच अदाकारीने, शाहिरीने ते रसिकांच्या गळ्यातील ताईत तर बनले होतेच; पण परदेशी रसिकांनाही त्यांनी नादावून सोडले होते. भारूड, गोंधळ, पोवाडे, अशा विविध लोकधारेने रसिकांची मने चिंब भिजवणारे शाहीर उमप हे पुढे देश-विदेशात नावाजले गेले. लंडनच्या कॉर्क आयलंड येथील आंतरराष्ट्रीय लोकसंगीत स्पर्धेत १९८३ साली त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करून प्रथम पारितोषिक पटकावले होते. याची सुरुवात झाली होती ती मात्र नायगावच्या बीडीडी चाळीतून.
ही कामगार, श्रमिक, कष्टकऱ्यांची चाळ. तेथील १३ क्रमांकाच्या इमारतीमधील छोट्याश्या खोलीत १९३१ साली त्यांचा जन्म झाला. ही चाळ श्रमिकांची असली तरी त्या काळात तिथे विचारांची श्रीमंती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची स्फुल्लिंगे तेथील वातावरणातच होती. तीच चेतना घेऊन ते वाढत होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीला प्रारंभ केला. प्रतिकूल परिस्थितीच संघर्षाचे बळ देते. विठ्ठल उमप हेही परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेले होते. लहानपणी हातात बुलबुलतरंग आले ते पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी. पण तेव्हाही मनात विचारांची बिजे रुजतच होती. आंबेडकरी जलसे, कव्वालीचे सामने यांतून ते गात होते. गोपाळ कर्डक यांची कव्वाल पार्टी होती. त्यात ते काही काळ सामिल झाले होते; पण त्यातच ते रमले नाहीत. समाजपरिवर्तनासाठी कला हे त्यांचे सुत्र पक्के होते. त्यामुळेच वयाच्या तिशीत ते लोकशाहिरीकडे वळले. तेव्हा सुरू झालेला त्यांचा तो प्रवास वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत सुरूच होता. परिस्थितीचे चढ-उतार येतच होते. त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नीने. कधी भाजी विकून, तर कधी घरभांडी करून त्यांनी घर चालवले. प्रारंभी ते राष्ट्र सेवा दलाच्या ‘महाराष्ट्र दर्शन’ कार्यक्रमातून आपली कला सादर करीत असत. पुढे त्यांनी स्वतःची ‘शाहीर विठ्ठल उमप पार्टी’ काढली. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आकाशवाणीवर लोककलांचे अनेक कार्यक्रम केले. पुढे एचएमव्ही कंपनीने त्यांच्या गाण्यांची रेकॉर्ड काढली. ‘ये दादा आवार ये, कवरा वाटा लावला मोटा….बोंबील, वाकटी, कोलंबी, काटी हाणला म्हावरा झे रे झे…’ हे त्यातले गाणे प्रचंड गाजले. ‘फू बाई फू फुगडी फुू…. दमलास काय माझ्या गोविंदा तू… ‘ या गीताने तर त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.
‘क्रांतिबा महात्मा फुले, विर जन्मले, सुधारक झाले’ यांसारख्या पोवाड्यांतून ते पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोचवत होते. याच काळात त्यांची गाठ पडली अशोक परांजपे यांच्याशी. इंडियन नॅशनल थिएटरने तेव्हा लोककला विभाग सुरू केला होता. त्या प्रेरणेतून शाहीर लोकनाट्यांकडे वळले. ‘अबक दुबक तिबक’, ‘खंडोबाचे लगीन’, ‘विठो रखमाय’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी अभिनय केला. त्यांच्या ‘जांभूळ आख्याना’ने तर रसिकांना वेडच लावले. अनेक प्रयोग झाले त्याचे. अनेक नामवंतांनी नावाजले ते.
जुन्या रेडिओच्या जमान्यातला हा कलावंत… पण त्यांनी नवी माध्यमेही तेवढ्याच ताकदीने हाताळली. दुरदर्शनवर ‘जिवाची मुंबई’ सारखे लोकनाट्य सादर करून त्यांनी वाहवा मिळविली. काही चित्रपटांतही त्यांनी काम केले. काव्यप्रतिभा अंगी होतीच. अनेक गाणी लिहिली त्यांनी. ‘पहिल्या धारेची’ हा त्यांचा विनोदी काव्यसंग्रह आणि ‘फू बाई फू’ हे आत्मचरित्र. दरम्यानच्या काळात ते बीडीडी चाळीतून विक्रोळीला कन्नमवार नगरातील ज्ञानदीप सोसायटीत राहायला आले होते. समाजाकडून मानमान्यता मिळाली होती. शासनाकडून पुरस्कार मिळाले होते.
त्यांचे सुपुत्र नंदेश उमप सांगतात, गरीब घरात जन्माला आलो आम्ही. पण त्या घराण्याचे मुल्य पैसा हे नव्हते, तर आई-वडिलांनी दिलेले संस्कार होते. शाहिरांचे आयुष्य कृतार्थ झाले होते. २०१० मध्ये २६ नोव्हेंबर रोजी नागपूर मध्ये दीक्षाभूमीजवळ एका दुरचित्रवाणी वाहिनीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते गेले होते. कार्यक्रमात गौतम बुद्धांच्या मुर्तीला त्यांनी नमन केले. ‘जय भीम’चा जोरदार नारा दिला आणि त्याच क्षणी हृदयविकाराच्या झटक्याने ते कोसळले. उपचारांसाठी नेतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. नवता आणि परंपरा यांचा सुरेल संगम असलेला, आंतरराष्ट्रीय चाळीत जन्मलेला आणि याच संस्कारांच्या जोरावर राष्ट्रीय,आंतराष्ट्रीय मंच गाजवणाऱ्या लोकशाहिराच्या आख्यानाची भैरवी व्यासपीठावरच व्हावी हा मोठाच योगायोग म्हणावयाचा….!!
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
राष्ट्रशाहीरअमर शेख: समाजमनी जोश भरत मराठी अस्मितेचा ध्वज फडकवला!