डॉ.जितेंद्र आव्हाड
मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध करणारे, येथील समाजाला पुरोगामी दिशा देणारे, सुधारणावादी पत्रकार, नाटककार, नेते, वक्ते म्हणून प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नाव आजही बहुमानाने घेतले जाते. आजच्या पिढीला भलेही त्यांची ओळख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील अशी असेल; पण आपल्या विचारकोदंडाच्या टणत्काराने महाराष्ट्राला आत्मभान देणारे बहुजनवादी विचारवंत ही देखील त्यांची तितकीच महत्वपूर्ण अशी ओळख आहे. अंगभूत कर्तुत्व, अभ्यास, वैचारिक बेडरता व खास ठाकरी भाषा ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ ला पनवेल येथे झाला. मध्यप्रदेशातील देवास येथे शिक्षणासाठी काही काळ राहिल्यानंतर १९०२ च्या सुमारास नोकरीच्या शोधात प्रबोधनकार पहिल्यांदा मुंबईत आले. त्यावेळी त्यांचे बिऱ्हाड होते धसवाडीतील शेणव्याच्या चाळीत. तेथे फणसे म्हणून त्यांचे परिचीत होते,त्यांच्या खोलीतल्या माळ्यावर ते राहत असत. त्या काळात त्यांनी एका इंग्रजी शाळेत पहिल्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याची नौकरी स्विकारली पण प्लेग च्या साथीत वडीलांचे निधन झाले, घराची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांची मुंबई काही काळासाठी सुटली. आर्थिक विपन्नावस्थेमुळे काही वर्षातच त्यांनी पुन्हा पनवेलहून मुंबईस आपल्या बंधूंसह प्रयाण केले. तेव्हा झावबावाडीत नुकत्याच निर्माण झालेल्या कृष्णाबाई बिल्डिंग येथे भाड्याच्या खोलीत ते राहू लागले. तेथे सगळेच सडेफटिंग. त्यामुळे तेथे अशा ‘सडेसोट बजरंगा’चा सतत राबता असे. विशेष म्हणजे यामुळेच प्रबोधनकारांनी या खोलीला नाव ठेवले होते – नरपागा.
१९१० च्या जानेवारीत अलिबागनजिक वरसोली येथे प्रबोधनकारांचा विवाह झाला. त्यानंतर ते नवपरिणीत वधूसह राहायला आले दादर येथील मिरांडाच्या चाळीत. याच चाळीत ‘प्रबोधन’ जन्माला आले. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म आणि धर्माची देवळे, कुमारिकांचे शाप, ग्रामण्यांचा इतिहास, दगलबाज शिवाजी, संगीत विधिनिषेध, शनिमाहात्म्य, शिवाजीचा वनवास यापैकी अनेक ग्रंथ याच चाळीत रचले गेले. येथुनच विविध बहुजनवादी लढाया सुरू झाल्या. फार काय तर येथेच शिवसेना या अस्सल महाराष्ट्रीय संघटनेचे बिज रोवले गेले.
चाळींच्या संस्कारांतून आणि आलेल्या अनुभवांतून प्रबोधनकारांनी आपल्या विचारांचे अग्निकुंड नेहमी धगधगते ठेवले. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीतील कार्य आणि निर्माण केलेलं साहित्य हे कालातीत आहे.चाळ संस्कृतीने दिलेला हा हिरा आजदेखील आपल्या विचारांच्या दमावर मोठ्या ताकदीने लखलखतो आहे..!!
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)