मुक्तपीठ टीम
नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. यात आज शेतकरी आंदोलक राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही कारणास्तव अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनही तयारी करत आहे. आजचे आंदोलन हे दुपारी १२ ते ३ असल्याने तीन तासच वाहतूक बंद असेल.
शेतकरी नेते राकेश टिकैट यांनी, ज्यांना दिल्ली सीमेवर येणे शक्य नाही आहे, त्यांनी आपापल्या परिसरात शांततेच्या मार्गाने एकत्र जमा होण्याचे आवाहन केले आहे. आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीसोडून देशभर रस्ते रोखले जाणार आहेत.
दिल्ली सीमांवर बहुस्तरीय सुरक्षा
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बहुस्तरीय सुरक्षा उभारली आहे. पोलिसांनी उचललेले पाऊल जगभर टीकेचा विषय झाले आहे. पोलिसांनी रस्ते खोदून तेथे मोठे खिळे ठोकले आहेत. तसेच काँक्रिटचे पक्के अडथळे उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर लोखंडी बॅरिकेट्स उभारले गेले आहेत. पोलिसांनी २६ जानेवारीप्रमाणे शेतकरी आंदोलक ट्रॅक्टर्ससह दिल्लीत घुसू नये यासाठी एवढी सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांसाठी एवढी सुरक्षा उभारण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं जास्त योग्य नव्हतं का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आज का आंदोलन?
• मोदी सरकारचे कृषि कायदे मागे घ्यावेत आणि अन्य नेहमीच्या मागण्यांसोबत अन्य मागण्या आहेत
• अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केलेल्या दुलर्क्षाचा निषेध
• आंदोलनाच्या ठिकाणी इंटरनेट जामचा विरोध
• पोलिसांनी जप्त केलेले ट्रॅक्टर परत करण्याची मागणी
• शेतकरी आंदोलकांच्या सुटकेची मागणी
दिल्लीत आंदोलन नाही, तरीही पोलीस सज्ज
शेतकरी नेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची घोषणा केली आहे. मात्र, दिल्लीत आंदोलन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना या आंदोलनाबद्दल अधिकृतरीत्या कळवण्यात आलं नसल्याचं सांगितलं आहे. दिल्लीत महामार्ग रोखण्यासंबंधित कोणत्याही शेतकरी नेत्याने आमच्याशी संपर्क साधलेला नाही, परंतु तरीही पोलीस यावेळी धोका पत्करण्यास तयार नाहीत. आम्ही कडेकोट बंदोबस्त ठेवला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.