मुक्तपीठ टीम
टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे कौतूक केले तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाहीही दिली. ते म्हणाले, “जलक्रांतीतून हरितक्रांती, हरित क्रांतीतून सुबत्ता येणार. त्यासाठी टीमवर्कची आवश्यकता आहे.” त्यानंतर ते पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्याकडे वळून म्हणाले, मी कोटी करत नाही, पण या कार्यामुळे आमिरची अमीरी गावोगावी जाईल!!”
२२ मार्चच्या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमात कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक, राज्याच्या १८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.
जलक्रांतीतून हरितक्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशनने केले. यातली प्रयोगशीलता समजून सांगितली.
पाण्याचा जमीनीखालचा सातबारा कसा मोजायचा हे समजावून सांगितले. शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचा असतो. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज आहे. यातूनच अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल.
पावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे, कालवे या माध्यमातून साठवतांना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यतच नाही तर मुळापर्यंत जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी लागते. तीच तयारी पाणी फाऊंडेशनने केली, गावकऱ्यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशांसोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.
दक्षता समित्यांनी गावांची काळजी घ्यावी
कोरोनाने पुन्हा खुप मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असल्याने गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर काम करावे, गावात कुणी विनामास्क फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याची, त्रिसुत्रीचे पालन करायला लावण्याची शिस्त लावावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार – अमीर खान
यावेळी अमीर खान म्हणाले, पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्नं उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रात काम सुरु केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन सध्या फक्त ९०० गावात काम करत असल्याचेही ते म्हणाले.
कृषी विभागाच्या योजनांचेही बळ देणार – कृषी मंत्री
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल असे म्हटले तसेच देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शेतकरी चिंतामुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘विकेल ते पिकेल’ योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले. समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांचे बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही भुसे म्हणाले. त्यांनी कृषी विभागाच्या काही महत्वाकांक्षी योजनांचीही यावेळी माहिती दिली.
पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज – गडाख
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ६० टक्के महाराष्ट्र जिरायती असून तिथे पाणलोटाची कामे केल्याशिवाय पर्याय नसल्याने पाणी फाऊंडेशनचे काम खुप महत्वाचे आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज असून त्यादिशेने काम सुरु झाले आहे.
कार्यक्रमात स्पर्धेत सहभागी गावातील काही गावकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. वाशिम आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनीही यावेळी स्पर्धेत सहभागी तालुक्यांची माहिती देऊन शासन पाणी फाऊंडेशनसमवेत समृद्ध गाव निर्मितीसाठी काम करत असल्याचे सांगितले.
सहा विषयांवर लक्ष केंद्रीत
यावेळी किरण राव, डॉ. अविनाश पोळ यांनीही आपले या लोकचळवळीतील अनुभव सांगितले. तसेच मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, माती संवर्धन, पौष्टिक गवत संवर्धन, वृक्ष लागवड व प्रत्येक शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न १ लाखपर्यंत वाढवणे या सहा महत्वाच्या उद्दिष्टांवर आता पाणी फाऊंडेशन काम करत असल्याची माहितीही दिली.