मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्सवाचा भाग म्हणून ‘युवा टुरिझम क्लब’ स्थापन करायला सुरुवात केली आहे. युवा पर्यटन क्लबची संकल्पना भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत तयार करणे आणि विकसित करणे हे आहे, ज्यांना भारतातील पर्यटनाच्या क्षमतांची जाणीव असेल, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन करतील आणि पर्यटनाबाबत आवड निर्माण करतील. हे युवा राजदूत भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्प्रेरक ठरतील. पर्यटन क्लबमधील सहभागामुळे सांघिक भावना, व्यवस्थापन, नेतृत्व यांसारख्या कौशल्यांचा विकासाला मदत होण्यासोबतच जबाबदार पर्यटन पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे आणि शाश्वत पर्यटनाची काळजी घेणे अपेक्षित आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने पर्यटन मंत्रालयाच्या उपक्रमासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे आणि सर्व सीबीएसई संलग्न शाळांना युवा टुरिझम क्लब स्थापन करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत.
याबाबत बोलताना केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, युवक हे भारताचे आणि समृद्ध सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि नैसर्गिक वारशाचे सर्वोत्तम राजदूत आहेत. विविध शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेले युवा पर्यटन क्लब राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन आणि पंतप्रधानांच्या एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला चालना देतील.
रेड्डी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आता देशांतर्गत स्थळांची माहिती होईल आणि ते पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी साधनांनी सुसज्ज बनतील. हे टुरिझम क्लब मुलांना त्यांच्या आणि शेजारी राज्यांबद्दल तसेच सांस्कृतिक पैलूंबद्दल अधिक जागरूक राहण्यास मदत करतील. पंतप्रधानांच्या ‘देखो अपना देश’च्या आवाहनामुळे याला आणखी चालना मिळेल.
पाहा व्हिडीओ: