डॉ. आशिष देशमुख/ मुक्तपीठ
विदर्भातील शेतकऱ्यांचे शत्रू असलेल्या रोही आणि रानडुक्करांना पकडून नागपूर येथील ‘बाळासाहेब गोरेवाडा प्राणी संग्रहालया’त पाठविण्यासाठीचे विनंती पत्र विदर्भातील डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
शेतकऱ्यांसाठी डॉ.आशिष देशमुख यांनी लिहिलेले पत्र जसे आहे तसे:
विदर्भामध्ये सर्वदूर असलेल्या जंगल व झुडपी जंगलात भरपूर प्रमाणात जंगली श्वापदे आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने रोही आणि रानडुक्कर या प्राण्यांपासून शेतकरीवर्गास फार मोठा त्रास अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस हे जंगली श्वापदं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घूसून त्यातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत असतात. मुख्यत्वे करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचे पीक कापणीसाठी तयार असते त्यावेळेस हे प्राणी धान्य, कापूस, तूर, संत्रा, ऊस, सोयाबीन, हरभरा, गहू, धान, ज्वारी, बाजरी, मका, केळी, भाज्या व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करतात. जंगली श्वापदांच्या भीतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली हजारो हेक्टर शेतजमीन पडीत ठेवली आहे. नापिकी, जंगली श्वापदांचा त्रास आणि होणारे नुकसान यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतो.
महाराष्ट्रात गो-हत्याबंदी कायदा लागू आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीवरसुद्धा बंदी असल्याकारणाने मागील अनेक वर्षांपासून रोही आणि रानडुक्कर या प्राण्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे रोही आणि रानडुक्कर या प्राण्यांवर उचित कारवाई करून त्यांच्या शेतमालाचे संरक्षण व्हावे, ही शेतकऱ्यांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी मी शासनासमोर वारंवार मांडलेली आहे.
‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या’ उद्घाटनप्रसंगी आज आपण नागपूरला आले आहात. शेतकऱ्यांचे शत्रू असलेले रोही आणि रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या शेळ्या-मेंढ्यांपेक्षा जास्त आहे. विदर्भातील रोही व रानडुक्करांना पकडून या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यासंबंधीचे आदेश आपण संबंधित विभागाला द्यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी नम्र मागणी मी शेतकरीहितार्थ आपणांकडे करीत आहे.