मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातलं पहिलं खासगी विद्यापीठ असलेल्या एमिटी युनिव्हर्सिटीत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. एमिटी स्कूल ऑफ फाईन आर्ट्सनं ‘म मराठीचा’ ही दोन दिवसांची कॅलिग्राफी कार्यशाळा घेतली. यात खासकरुन अमराठी विद्यार्थ्यांना देवनागरी लिपी शिकवण्यात आली. कार्यशाळेत मराठी कविता कॅलिग्राफीतून साकारण्यात आल्या. त्या आधी या विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिवस का साजरा करण्यात येतो. त्याचं महत्त्व काय याची माहिती देण्यात आली. मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्द, मराठी कविता, मराठी गौरव गीत आदींची कॅलिग्राफी तयार करण्यात आली आणि त्याचं प्रदर्शनही करण्यात आलं. तर एमिटी स्कूल लँग्वेज तर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मराठी कविता वाचण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यांनी मराठीतले नावाजलेले कवी तसंच स्वताच्या कवितांचं सादरीकरण केलं. कार्यक्रमाची खासियत म्हणजे अनेक अमराठी मुलांनी मराठीतल्या कविता आणि मराठी उतारे वाचून दाखवले. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. इंग्लिशच्या रेट्यामुळं मराठी आणि अन्य भारतीय भाषा मागे पडतायत. म्हणूनच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा वापर करण्यावर भर देण्यात आला. एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मुलं ही परराज्यातून आलेली असतात. त्यांना मराठीचे बोलण्याचे आणि ती चितारण्याचे धडे देण्यात आले हे विशेष.