मुक्तपीठ टीम
कुछ खास है हम सभी मै.. असं म्हणत चॉकलेट बनवणारी कंपनी कॅडबरीने आता त्यांची नवी जाहिरात आणली आहे. या जाहीरातीचं सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे. ९० च्या दशकात क्रिकेटच्या मैदानावर दिलखुलासपणे आपला आनंद व्यक्त करणारी तरुणी आणि तिचा क्रिकेटर मित्र यांच्यातलं गोड नातं उलगडून दाखवणारी कॅडबरीची जाहिरात प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. आता याच जाहीरातीला सुंदर ट्विस्ट देण्यात आला आहे. जाहीरातीची संकल्पना तीच, तेच मैदान, तेच हावभाव मात्र पात्र बदलेत.. आता क्रिकेटर तरुणाच्या ठिकाणी क्रिकेटर तरुणी आणि तिच्या आनंदात सहभागी होणारा, मैदानात नाचत गाजत जाणारा तिचा मित्र, असा ट्विस्ट जाहिरातीला देण्यात आला आहे. या नव्या जाहिरातीला पोस्ट करत ‘कॅडबरी’ ने सांगितलं आहे की, आओ, साथ जश्न मनाए. उन लड़कियों के लिए जो सफलता की नई ऊंचाइयों को छू रही हैं और युवाओं के लिए रोल मॉडल के रूप में उभर रही है.
कॅडबरी डेरी मिल्कच्या या दोन्ही जाहीराती ओगिल्वी या एजन्सीने बनवल्या आहेत. ही जाहिरात सत्य घटनेवर आधारीत असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर जाहीरातीतल्या पात्रांच्या लिंग अदलाबदलीचं कौतुक केलं जात आहे.
कॅडबरीने का बनवली अशी जाहिरात?
नुकत्याच पार पडलेल्या ऑलिंपिंक आणि पॅरालिंपिक स्पर्धेत महिला खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. महिला खेळाडूंनी सुवर्ण, कांस्य, रौप्य पदकांची कमाई करत देशाचं नावं उंचावलं आहे. काही खेळा प्रकारांमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. त्यामुळे महिला खेळाडूंचा गौरव करण्यासाठी कॅडबरीने ही जाहिरात बनवली आहे.
कॅडबरीच्या जाहीरातीवर सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
(हिंदीमधले ट्विट्स मराठीत भाषांतरीत केले आहेत.)
- अरे देवा.. खूप सुंदर ट्विस्ट आहे. आम्ही ही जाहीरात पाहता पाहता लहानांचे मोठे झालो आणि आता याचा रिमेक पाहत आहोत. मला खूप आनंद होत आहे.
- छान रिमेक आहे. वास्तविक पाहता जुनी जाहीरात आवडली आहे. मात्र ही जाहीरातही लक्षात राहण्यासारखी आहे.
- १९९४ मध्ये ओगिल्वीने कॅडबर डेरी मिल्कची जाहीरात बनवली. २०२१ मध्ये ओगिल्वी इंडियाने पुन्हा हीच जाहीरात बनवली. मात्र ही वेगळी जाहीरात आहे. लैंगिक समानतेजवळ पाऊल टाकणाऱ्या समाजाचं चित्र यात दर्शवण्यात आलं आहे. आपल्या बॅटने चेंडूला मैदानापार टोलवणाऱ्या प्रत्येक मुलीला शुभेच्छा.
- ९० च्या दशकात माझी सर्वाधिक आवडती आणि नेहमी लक्षात राहील, अशी ही जाहीरात आहे. कॅडबरीने खूप सुंदरपणे ही जबाबादारी पार पाडली आहे.