मुक्तपीठ टीम
व्यापाऱ्यांचा एमएसएमईमध्ये समावेश झाल्यामुळे आता, देशातील सर्व व्यापाऱ्यांना कमी व्याजदराने अर्थपुरवठा मिळणे सुलभ होणार असून कमी वाढीव सुरक्षा हमीवर कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक आहे, अशा शब्दांत भाजपाच्या आर्थिक आघाडीचे महाराष्ट्र राज्य संयोजक सीए मिलिंद कानडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
एमएसएमई संदर्भात घेण्यात आलेल्या या निर्णयाचे व्यापक परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे महागाई कमी होण्यास हातभार लागणार असून एमएसएमईला जवळपास ४० कोटी लोकांना रोजगार प्राप्त करून देता येईल. सोबतच, वार्षिक ११५ लाख कोटींची उलाढाल करता येईल. व्याजदर कमी केल्यामुळे खर्च कमी होईल आणि त्यामुळे वस्तूंच्या किंमतीही कमी होतील आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. रोजगार वाढल्यामुळे निश्चितपणे व्यवसायातदेखील वृद्धी होईल, असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपाकडून सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला, असे मिलिंद कानडे म्हणाले.
व्याजाचे दर कमी झाल्यामुळे आणि शिथिल करण्यात आलेल्या अटींमुळे व्यापाऱ्यांना उद्योगांसाठी मुबलक प्रमाणात कच्चा माल कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात मदत होईल.
व्यापाऱ्यांचा एमएसएमईमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता व्यापारी एमएसएमई प्रवर्गात येणार असून बँक आणि वित्तीय संस्थांकडून प्राधान्य क्षेत्रातील कर्जाच्या अंतर्गत आवश्यक ते अर्थसहाय्य घेण्यास सक्षम ठरतील. याशिवाय, एमएसएमई प्रवर्गाला मिळणारे शासकीय योजनांचे लाभ व्यापाऱ्यांनादेखील घेता येतील. कोविड या साथीचा रोगामुळे प्रभावित झालेले देशभरातील व्यवसाय / व्यापारी आता बँकेचे सहाय्य घेऊन त्यांचे व्यवसाय प्रभावीपणे पुनर्संचयित करण्यास सक्षम ठरतील, असे त्यांनी म्हटले आहे.