प्रसाद नायगावकर
लग्नाची इच्छा तीव्र म्हणजे किती तीव्र असू शकते हे यवतमाळच्या शहाजी राकडे या तरुणानं दाखवून दिलं आहे. त्याची हळदी आणि लग्नाचा मुहूर्त ठरला आणि नेमका महापूर आला. पण हार न मानता शहाजीनं खर्माकोलच्या तुकड्यावर बसून प्रवास केला. हळद उरकली आणि त्यानंतर लग्नाच्या तयारीला लागला. जीवाचा धोका पत्करूनही लग्नाचा मुहूर्त टळू न देणाऱ्या या नवरदेवाची चर्चा पुराच्या पाण्याएवढ्यात वेगानं व्हायरल होत आहे.
हळदीच्या कार्यक्रमाला नवरदेवाने चक्क पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात सात किलोमीटर अंतर पार केले. तो थर्माकोलच्या सहाय्याने नियोजित ठिकाणी पोहचला. ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड तालुक्यातील चिंचोली गावची.
नांदेड जिल्ह्यातील कोराडी येथील शहाजी राकडे याचा विवाह उमरखेड तालुक्यातील गायत्री गोंगाडे यांच्याशी एक महिन्यापूर्वी ठरला होता. मात्र, सहा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर आलाय. अशातचं नवरदेव असलेल्या शहाजीचं आज लग्न आहे. मात्र आज त्याचा हळदीचा कार्यक्रम होता त्यासाठी नवरदेव शहाजी,आणि त्याचे नातेवाईक हे चक्क थर्माकोलच्या तुकड्यांवर बसून चक्क पैनगंगा नदीला आलेल्या पुराची परवा न करता संगम चिंचोलीपर्यंतचे सात किलोमीटर अंतर नदीतून पार केले. विशेष म्हणजे हळदीचा कार्यक्रम यशस्वी पार करुन नातेवाईक पुन्हा होडीने नदीतून करोडी गावाला पोहंचले.
नवरदेव मात्र लग्न असल्याने संगम चिंचोली ला थांबला आहे. वऱ्हाडी मंडळी संगम चिंचोली जाणार आहेत. आज दुपार नंतर पाऊस थांबल्याने पुर ओसरू लागला आहे.